Eknath Khadse : शिवसेनेला बेडूक म्हणणाऱ्या गिरीश महाजनांना शिवसेना उत्तर का देत नाही?; एकनाथ खडसेंचा सवाल

| Updated on: May 15, 2022 | 2:29 PM

Eknath Khadse : जळगाव जिल्ह्यातील चित्रं वेगळं आहे. मात्र गिरीश महाजन बेडकाबरोबर कसे जातात ते माहिती नाही. याबाबतचे सविस्तर उत्तर शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी देण्याची आवश्यकता आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले.

Eknath Khadse : शिवसेनेला बेडूक म्हणणाऱ्या गिरीश महाजनांना शिवसेना उत्तर का देत नाही?; एकनाथ खडसेंचा सवाल
सातत्याने टीका करणाऱ्या गिरीश महाजनांना शिवसेना उत्तर का देत नाही?; एकनाथ खडसेंचा सवाल
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

जळगाव: भाजप नेते गिरीश महाजन (girish mahajan) सातत्याने शिवसेनेवर टीका करत असतात. महाजन यांचा टीकेचा रोख राष्ट्रवादी आणि काँग्रेसपेक्षा शिवसेनेवर अधिक असतो. तरीही शिवसेनेकडून महाजनांना उत्तर दिलं जात नाही. त्यावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (eknath khadse) यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्र्यांवर सातत्याने टीका करणाऱ्या गिरीश महाजनांना शिवसेना उत्तर का देत नाही?, असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला आहे. एका बाजूला गिरीश महाजन शिवसेनेला सातत्याने हिणवतात. शिवसेनेवर टीका करतात. आणि दुसऱ्या बाजूला जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील (gulabrao patil) महाजनांसोबत चहा घेतात. जेवण करतात, असा टोलाही त्यांनी लगावला. शिवसेना म्हणजे गटारीतला बेडूक असल्याची टीका गिरीश महाजन यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर खडसे यांनी ही टीका केली. तसेच शिवसेना बेडूक नाही, हत्ती आहे हे महाजनांना दाखवून द्या, असंही खडसे यांनी म्हटलं आहे.

एकनाथ खडसे यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली. एकिकडे गिरीश महाजन हे शिवसेनेला हिणवतात, बेडूक म्हणतात. मात्र दुसरीकडे जिल्हातील शिवसेनेच्या पालक मंत्र्यांसोबत चहा घेतात, जेवण करतात. छुपी युती करतात. जळगाव जिल्ह्यातील चित्रं वेगळं आहे. मात्र गिरीश महाजन बेडकाबरोबर कसे जातात ते माहिती नाही. याबाबतचे सविस्तर उत्तर शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी देण्याची आवश्यकता आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

मला अजून समजलेलं नाही

गिरीश महाजन सातत्याने महाविकासआघाडी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतात मात्र शिवसेनेकडून त्याचे उत्तर अजून पर्यंत मिळालेले नाही. शिवसेनेने त्यांच्या टीकेला अजूनपर्यंत उत्तर का दिले नाही हे मला अजून पर्यंत समजलेले नाही, असा टोलाही त्यांनी हाणला.

कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही

दरम्यान, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी महाजनांवर टीका केली. कोणी कोणाला बेडूक म्हटलं म्हणून माणूस बेडूक होऊ शकत नाही, कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. गिरीश महाजन हे जिल्ह्याचे नेते आहेत. त्यांनी जिल्ह्यापुरतं बोलावं, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली. तसेच, कालची सभा ऐतिहासिक सभा होतीय या सभेला 2 लाखांहून अधिक लोक उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यात देशात काय चालू आहे, तसंच मुंबईच्या बाबतीत विरोधी पक्षाच्या काय भूमिका आहेत, याबाबत स्पष्ट उल्लेख केला. ज्यांनी ज्यांनी बाळासाहेबांची अॅक्टिंग केली, जे स्वतःला बाळासाहेब समजायला लागले त्यांना हे प्रत्युत्तर आहे, असंही पाटील म्हणाले.

काय म्हणाले गिरीश महाजन?

शिवसेना म्हणजे गटारातील बेडूक आहे. यांनी जगात काय चालले आहे ते बघावं. संपूर्ण देश मोदीजींकडे बघतो आहे. मोदीजींवर बोलण्याचा तुम्हाला काही एक अधिकार नाही. मोदींना तुमच्यासारख्यांच्या सर्टिफिकेटची जरूरत नाही, असे म्हणत माजी मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अटलजींची भाजप उरली आहे का? या मुद्दावर बोलताना निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे हे सत्ता लंपट झाले आहेत. त्यांना फक्त त्यांची खुर्ची जपायची आहे. ते सत्ता लंपट झालेले आहेत. त्यामुळे त्यांना औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन पाया पडा, नमाज पडा किंवा फुलं वाहा… उद्धव ठाकरेंना काहीच फरक पडत नाही. भोंग्यांच्या प्रश्नावर ते एक शब्दही बोलायला तयार नाहीत. हनुमान चालीसाच्या मुद्द्यावर देखील एक शब्द देखील बोलायला ते तयार नाही. यामुळे त्यांच हिंदूत्व किती बेगडी आहे हे सर्वांच्या लक्षात आल आहे, असा हल्लाही महाजन यांनी चढवला होता.