
राज्यात मुंबईसह 29 महानगर पालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. अगदी आज सकाळपर्यंत युती-आघाड्यांची बोलणी सुरु आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्ष आपल्या सोयीनुसार काही ठिकाणी युती-आघाडीत तर काही ठिकाणी स्वतंत्रपणे निवडणुका लढवत आहेत. छत्रपती संभाजीनगर पाठोपाठ आणखी एका मोठ्या महापालिकेत शिवसेना-भाजप युती फिस्टकली आहे. भाजपसाठी मोठा धक्का हा आहे की, अजित दादा आणि एकनाथ शिंदे एकत्र आले आहेत. हे दोन्ही नेते राज्याचे उपमुख्यमंत्री असून भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये आहेत. आता एका मोठ्या महानगरपालिकेत भाजपला एकट्याला सोडून अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची युती होणार आहे. हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. येत्या 15 जानेवारीला मतदान होणार आहे. 16 जानेवारीला या निवडणुकांचा निकाल लागेल.
नाशिक महापालिका निवडणुकीत अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र आली आहे. नाशिक महापालिकेची एकूण सदस्यसंख्या 122 आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना 92 ते 95 आणि अजितदादांची राष्ट्रवादी 27 ते 30 जागांवर निवडणूक लढवणार आहे. रिपब्लिकन सेनेला 2 जागा सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेसाठी त्रिशंकू लढाई होणार आहे. भाजप, शिवसेना-राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी असा सामना रंगेल. मागच्या दोन तीन वर्षात नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं. त्यांच्या अनेक मोठ्या नेत्यांनी एकतर शिंदेंची शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश केला.
या पक्ष प्रवेशाला विरोध
नुकताच विनायक पांडे आणि वाघ या ठाकरे गटाच्या दोन मोठ्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशावरुन भाजपमध्ये मोठं नाराजी नाट्य पहायला मिळालं. नाशिक भाजप कार्यालयाबाहेर आमदार देवयानी फरांदे यांना आपली नाराजी लपवता आली नाही. स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी या पक्ष प्रवेशाला विरोध केला होता.
भाजपा-शिवसेनेची युती फिस्कटल्याच जवळपास निश्चित
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भाजप स्वतंत्र लढण्याच्या तयारीत. 40 जागा शिंदे यांची शिवसेना स्वतंत्र लढणार तर 41 जागावर दादांची राष्ट्रवादी व शिंदे यांची शिवसेना सोबत लढणार असल्याची माहिती.शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांच्या दोन वेगवेगळ्या भूमिका, नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर स्वतंत्र लढणार तर नांदेड दक्षिणचे आमदार आनंद बोंढारकर व हेमंत पाटील दादांच्या राष्ट्रवादीसोबत.