नाशिकमधून मोठी बातमी! जिल्हा बँक थकीत कर्ज प्रकरणी भुजबळ कुटुंबियांना नोटीस, नेमकं प्रकरण काय?

| Updated on: Jan 13, 2024 | 6:04 PM

नाशिक जिल्हा सहकारी बँकेकडून थकीत कर्ज प्रकरणी भुजबळ कुटुंबियांना नोटीस बजावण्यात आलीय. गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्हा सहकारी बँक थकीत कर्जामुळे आर्थिक अडचणीत आलीय. थकीत कर्ज वसुलीसाठी बँकेकडून विविध माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.

नाशिकमधून मोठी बातमी! जिल्हा बँक थकीत कर्ज प्रकरणी भुजबळ कुटुंबियांना नोटीस, नेमकं प्रकरण काय?
chhagan bhujbal
Follow us on

चंदन पुजाधिकारी, Tv9 मराठी, नाशिक | 13 जानेवारी 2024 : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे ओबीसी एल्गार सभेच्या माध्यमातून राज्यात ठिकठिकाणी मेळावे घेत आहे. एकीकडे ओबीसी समाजाची बाजू मांडताना भुजबळ राजकीय अडचणीत असताना, आता भुजबळ यांच्या कुटुंबियांवर आर्थिक अडचण निर्माण झालीय. याचं कारण म्हणजे नाशिक जिल्हा सहकारी बँकेकडून थकीत कर्ज प्रकरणी भुजबळ कुटुंबियांना नोटीस बजावण्यात आलीय. गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्हा सहकारी बँक थकीत कर्जामुळे आर्थिक अडचणीत आलीय. थकीत कर्ज वसुलीसाठी बँकेकडून विविध माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. यात थकबाकीदारांना नोटीसा देखील बजावण्यात आल्या आहेत. बँकेने थकीत कर्ज वसुलीसाठी कडक पावले उचलले आहेत. आर्थिक तंगी दूर करण्यासाठी आता बँकेनेने थकबाकीदार असलेल्या भुजबळ कुटुंबीयांना नोटीस बजावलीय.

नेमकं प्रकरण काय?

नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील भुजबळ कुटुंबियांच्या मालकीच्या आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमिटेड या साखर कारखान्याला थकीत कर्ज प्रकरणी नोटीस देण्यात आलीय. एकूण ५१ कोटी ६६ लाखांच्या थकबाकी वसुलीसाठी बँक प्रशासनाकडून कारखान्याचे संचालक असलेल्या मंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र माजी आमदार पंकज भुजबळ आणि पुतणे माजी खासदार समीर भुजबळ यांना नोटीस बजावलीय. बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी साखर कारखान्याच्या स्थळावर जाऊन ही नोटीस चिकटवल्याची माहिती मिळालीय. त्याचप्रमाणे कारखान्याचे संचालक असलेल्या समीर आणि पंकज या भुजबळ बंधूना देखील नोटीस देण्यात आलीय.

५१ कोटी ६६ लाख रुपयांचं कर्ज थकीत

भुजबळ कुटुंबीयांनी दाभाडी येथील गिरणा सहकारी साखर कारखाना विकत घेतलाय. याच आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. (गिसाका) या साखर कारखान्यासाठी त्यांनी जिल्हा बँकेकडे १० नोव्हेंबर २०११ रोजी ३० कोटी रुपयांच्या कर्जाची मागणी केली होती. यानंतर बँकेने ३ जानेवारी २०१२ ला कर्ज मंजूर केले. त्यानंतर कारखान्याने ३० कोटींपैकी १८ कोटींची नियमित कर्ज परतफेड केली. मात्र २०१३ पासून कारखान्याकडे १२ कोटी १२ लाख थकीत मुद्दल आणि व्याज ३९ कोटी ५४ लाख असे एकूण ५१ कोटी ६६ लाख रुपये थकीत आहेत.

पंकज भुजबळ, समीर भुजबळ यांना नोटीस

बँकेची आर्थिक परिस्थिती ढासळल्याने थकीत कर्ज वसुलीसाठी जिल्हा बँकेने कडक पावले उचलण्यास सुरुवात केलीय. त्यानुसार आर्मस्ट्राँगकडील थकीत रक्कम वसुलीसाठी जिल्हा बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सरफेशी कायद्यांतर्गत कारखाना कार्यस्थळावर जाऊन नोटीस चिटकवली आहे. त्याचप्रमाणे कारखान्याचे संचालक असलेले पंकज भुजबळ, समीर भुजबळ यांच्यासह सत्येन आप्पा केसरकर यांनाही नोटीस बजावलीय.

नाशिक जिल्हा सहकारी बँकेला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जाताय. यातच थेट मंत्री छगन भुजबळ यांच्या कुटुंबीयांना थकीत कर्ज वसुलीसाठी नोटीस बजावलीय. याप्रकरणी आता पुढे भुजबळ कुटुंबीय थकीत कर्ज भरणार, की मालमत्ता जप्त होणार? हे बघणे महत्त्वाचे आहे.