अतिवृष्टी बाधित क्षेत्राचे ड्रोनद्वारे पंचनामे करावेत; भुजबळांचे अधिकाऱ्यांना आदेश

| Updated on: Oct 08, 2021 | 8:44 PM

पंचनामे करताना एकही बाधित शेतकरी वंचित राहणार नाही यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करा, अशी सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

अतिवृष्टी बाधित क्षेत्राचे ड्रोनद्वारे पंचनामे करावेत; भुजबळांचे अधिकाऱ्यांना आदेश
NASHIK CHHAGAN BHUJBAL
Follow us on

नाशिक : सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टी बाधित क्षेत्राचे तत्काळ पंचनामे करणे आवश्यक आहे. पंचनामे करताना एकही बाधित शेतकरी वंचित राहणार नाही यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करा, अशी सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री भुजबळ बोलत होते. या बैठकीस कृषी मंत्री दादाजी भुसे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे तर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, इतर आमदार तसेच शासकीय अधिकारी आदी बैठकीस प्रत्यक्ष उपस्थित होते.

पंंचनाम्यांचा अहवाल लवकरात लवकर सादर करा 

या बैठकीत “अतिवृष्टी बाधित क्षेत्राचे पंचनामे हे बिनचूक करण्यात येऊन केलेल्या पंचनाम्यांचा अहवाल लवकरात लवकर शासनाला सादर करण्यासाठी प्रशासनाने प्राधान्य देण्यात यावे. जेणेकरून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वेळेत मिळण्यासाठी मदत होईल,” असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

सूक्ष्म व तांत्रिक बाबींसह करावेत पंचनामे : कृषीमंत्री दादाजी भुसे

या बैठकीत दादाजी भुसे यांनी आपले मत मांडले. तसेच काही सूचना केल्या. पीकविम्याचा लाभ हा ई-पीक पाहणीच्या अहवालावर अवलंबून असल्याने यासारख्या सूक्ष्म तांत्रिक बाबींचा विचार करून पंचनामे करण्यात यावेत. एकही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच पिकविमा कंपन्यांच्या अधिकारी व कर्मचारी यांची तालुकानिहाय यादी सर्व लोकप्रतिनिधींना उपलब्ध करून देण्यात यावी, असे दादाजी भुसे म्हणाले. त्याचप्रमाणे तलाठी, ग्रामसेवक, कृषीसहायक यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात येऊन पंचनामे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. तसेच एसडीआरएफच्या धर्तीवर पंचनामे पूर्ण शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यात यावे, असेही यावेळी भुसे म्हणाले.

पावसाअभावी नुकसान झालेल्या क्षेत्राचाही विचार करावा : नरहरी झिरवाळ

या बैठकीत बोलताना “जिल्ह्यातील ज्या भागात पावसाअभावी पिकांची हानी झाली आहे, त्या क्षेत्राचेदेखील पंचनामे करण्यात यावेत. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी मदत होईल,” असे मत झिरवाळ यांनी मांडले.

जिल्ह्याला एकूण 28 कोटी 69 लक्ष अनुदान प्राप्त  

जिल्ह्यात 2020-21 या वर्षात तौक्ते चक्रीवादळाच्या अनुषंगाने जून 2021 मध्ये शेतीपिके, घरे, मनुष्यहानी अशा विविध बाबींसाठी जिल्ह्याला एकूण 28 कोटी 69 लक्ष अनुदान प्राप्त झाले आहे. त्याचप्रमाणे नुकत्याच झालेल्या गुलाब चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील 400 गावे बाधित झाले आहेत. या सर्व क्षेत्राचे पंचनामे शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याकरता क्षेत्रीय अधिकारी पूर्ण क्षमतेने काम करतील, असे आश्वासन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.

7 व 8 सप्टेंबर रोजी झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण

याचप्रमाणे 7 व 8 सप्टेंबर रोजी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असून त्याबाबतचा अंतिम अहवाल शासनास सादर करण्यात आला आहे. तसेच दुधाळ जनावरांमधील लम्पी स्कीन डिसीज या रोगाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्यातील पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या सहाय्याने जनावरांसाठी लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात येत आहे, असेही जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यावेळी सांगितले.

इतर बातम्या :

Ajit Pawar IT Raids : अजित पवार आणि निकटवर्तीयांवर आयकर विभागाचं धाडसत्र, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

खो-खो खेळाला प्रतिष्ठा आणि लोकप्रियता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार; अजित पवारांची ग्वाही

भुजबळ-कांदे वादानंतर आता आणखी दोन बडे नेते आमनेसामने, नाशिकमध्ये राष्ट्रवादी-शिवसेनेतील वाद विकोपाला