
नाशिक जिल्ह्यात बिबट्या मादी आणि पिल्ल्याची ताटातूट झाली होती. त्यानंतर वनविभागाने या माय लेकाची भेट घडवून आणल्याची सुखद घटना अंबोली परिसरात घडली आहे. त्यामुळे या बिबट्या मादी आणि छोट्या पिल्ल्याच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबोली येथील लक्ष्मण मेढे यांच्या मक्याच्या शेतात बिबट्याचे बछडे आढळून आले होते. घटनेची माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर तातडीने वनविभागाचे पथक आणि इको एको फाउंडेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

वनवनविभागाने त्याच ठिकाणी एका टोपलीत बछड्याला ठेवले होते. तसेच या ठिकाणी ट्रॅप कॅमेरा बसवण्यात आला होता. त्यानुसार रात्री आठ वाजेच्या सुमारास बिबट्या मादीने आपल्या बछड्यास अलगद उचलून नेले. हे कॅमेऱ्यातही टिपले आहे.

वनविभागाने मुक्या प्राण्यांतील आई आणि पिल्ल्याची झालेली ही ताटातूट दूर केली. या घटनेचा व्हिडीओही खुमासदार झाला आहे. वनविभाच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे. त्यामुळे परिसरातील स्थानिक शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.