
शैलेश पुरोहित, इगतपुरीः सुप्रसिद्ध अशा माउंटशाडो रिसॉर्टमधील हुक्का पार्टीत (Hookah party) नशेत बेधुंद होऊन झुलणारे 52 तरुणांना इगतपुरी न्यायालयाने (Court) दणका दिला आहे. त्यांची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडी रवानगी करण्यात आली आहे. तर देहविक्रीसाठी महिला पुरवणाऱ्या शिल्पा सिराज कुरेशी व दीपाली देवळेकर यांना 16 मार्चपर्यंत पोलीस (Police) कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती सरकारी वकील अॅड. अर्चना महाले यांनी दिली. तर उर्वरित 18 महिलांना कलम 15 प्रमाणे वात्सल्य होम प्रोटेक्शनमध्ये ठेवण्याचा आदेश दिला. या तरुणींचे नातेवाईक आल्यावर त्यांच्या ताब्यात कस्टडी दिली जाईल, तर उरलेल्या संशयित आरोपींचे जामीन अर्ज उद्या न्यायालयात दाखल करण्यात येणार असून, त्यांना जामीन मिळण्याची आशा खासगी वकिलांनी व्यक्त केली. मात्र, दुसरीकडे या पार्टीत चक्क देहविक्री सुरू असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे याची साखळी मोठी असून, या गुन्हेगारांचे कंबरडे मोडणे हे पोलिसांसमोरचे मोठे आव्हान असणार आहे.
नेमके प्रकरण काय?
इगतपुरी येथील माउंटशाडो रिसॉर्टमध्ये 13 मार्च रोजी मध्यरात्री हुक्का पार्टी रंगल्याची माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना मिळाली होती. त्यांच्या आदेशानुसार या ठिकाणी छापा टाकण्यात आला. तेव्हा रेवती कंपनीच्या हार्डवेअर स्पेअरपार्ट कंपनीतील देशातील आणि प्रत्येक राज्यातील होलसेल डिस्ट्रीब्यूटर असलेले ते 52 तरुण व देहविक्री करणार्या 18 तरुणीसह 2 महिलांना बेड्या ठोकण्यात आल्या. त्यांच्यावर इगतपुरी पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार कायदा व सिगारेट तंबाखू मुंबई प्रोव्हिजन अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
‘त्या’ आरोपी नव्हे पीडित
सर्व संशयितांना इगतपुरी पोलिसांनी न्यायालयात हजर केले. सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत युक्तिवाद चालला. यावेळी सरकारी वकिलांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी मागितली. मात्र, यामधील 18 महिला या अनैतिक कायद्यानुसार आरोपी होऊ शकत नाहीत. त्या पीडित असतात, असे म्हणत न्यायालयाने त्यांना वगळता इतर 52 तरुणांना न्यायालयीन कोठडी सुनावली. शिवाय सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन हा कायदा जामीनपात्र असल्यामुळे त्यांना पोलीस कोठडी नाकारली. मात्र, देहविक्रीसाठी महिला पुरवणाऱ्या दोघींना पोलीस कोठडी सुनावली. यावेळी संशयितांकडून अॅड राहुल कासलीवाल, सचिन भाटी, नदीम मेमन, विलास पाटील, संदेश देशमुख यांनी सरकारी वकीलांशी युक्तिवाद केला.