Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

हिंदीतील ज्येष्ठ लेखक विनोद कुमार शुक्ल यांची वेदना समजून घेण्यासाठी त्यांनी सप्टेंबर 2019 मध्ये प्रकाशकांना लिहिलेले हे पत्र वाचा. 'मी आपल्याला स्पीडपोस्ट केले आणि ई-मेल पाठवून माझी पुस्तके छापू नका, असे कळवले. मात्र, तरीही आपण माझ्या पुस्तकांची नवी आवृत्ती काढली. याबाबत मी तुम्हाला फोनही केला होता. फोनवरही माझी पुस्तके प्रकाशित करू नका, अशी विनंती केली. त्यानंतरही आपण नवी आवृत्ती काढली. यापूर्वीही तुम्ही माझ्या पुस्तकाच्या जितक्या आवृत्ती काढल्या त्याची पूर्वकल्पना मला दिली नाही. यामुळे मी अतिशय दुःखी आहे.'

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?
विनोद कुमार शुक्ल
Follow us
| Updated on: Mar 15, 2022 | 5:40 PM

Justice for Vinod Kumar Shukla | हिंदी सिनेसृष्टीतले अमिताभ बच्चन हे नाव घेतले की ही त्यांचा रुतबा, मानमरातब आणि कर्तृत्व जगाला ओरडून सांगावा लागत नाही. तितकेच मोठे स्थान हिंदीतले (Hindi) ज्येष्ठ लेखक विनोद कुमार शुक्ल (Vinod Kumar Shukla) यांचे. जे वाचनाचे तुफान वेडे आहेत. ज्यांचे सगळ्याच भाषेतील साहित्यावर नितांत प्रेम आहे, त्यांना विनोदकुमार शुक्ल यांची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. त्यांची 1979 मध्ये ‘नौकर की कमीज़’ ही कादंबरी आली. मध्यवर्गीयांचे चटके तिने वेगळ्याच पद्धतीने जगासमोर आणले. त्यानंतर आलेल्या ‘दीवार में एक खिड़की रहती थी’ या कादंबरीने इतिहास निर्माण केला. याबद्दल 1999 त्यांना साहित्य अकादमी (Sahitya Akademi) हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला. या पुस्तकांनी भारतीय सीमा केव्हाच ओलांडल्या. मात्र, तरीही इतक्या मोठ्या लेखकाची हिंदीतील ख्यातनाम प्रकाशकांनीच लूट केल्याचे समोर आले आहे. विनोद कुमार शुक्ल यांचे रॉयल्टीच्या नावाखाली अक्षरशः आर्थिक शोषण सुरूय. शुक्ल यांची अपार साहित्य संपदा आहे. शिवाय या दोन्ही पुस्तकांच्या अजूनही दरवर्षी हजारो प्रती खपतात. मात्र, त्यापोटी त्यांना गेल्या वर्षी सुप्रसिद्ध अशा राजकमल प्रकाशन आणि वाणी प्रकाशन या दोघांनी मिळून फक्त 14 हजारांची रॉयल्टी दिली. त्यामुळे लेखकाच्या आर्थिक शोषणाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आलाय. आता विनोद कुमार शुक्लांच्या न्याय मागण्यांसाठी हिंदी साहित्य वर्तुळात एक अभियान चालवले जातेय. मात्र, या साऱ्या प्रकरणावर या दोन्ही प्रकाशकांनी मौन बाळगले आहे.

कोण आहेत विनोद कुमार शुक्ल?

विनोद कुमार शुक्ल हे हिंदी साहित्यातले अतिशय मोठे नाव आहे. त्यांचा जन्म 1 जानेवरी 1937 रोजी छत्तीसगढमधील राजनंदगाव येथे झाला. ते पेशाने प्राध्यापक होते. त्यांचा पहिला कवितासंग्रह 1971 मध्ये ‘लगभग जय हिन्द’ नावाने प्रसिद्ध झाला. 1979 मध्ये त्यांची सुप्रसिद्ध अशी ‘नौकर की कमीज़’ ही कादंबरी आली. यावर मणिकौल यांनी चित्रपटही बनवला. त्यानंतर आलेली ‘दीवार में एक खिड़की रहती थी’ ही कादंबरीही खूप गाजली. या कादंबरीसाठी त्यांना 1999 मध्ये सर्वोच्च अशा साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यानंतर त्यांचे अनेक कथा आणि कवितासंग्रहही आले. त्यांना देशभरातून मानाचे पुरस्कार मिळाले. भारतीय कविता आणि कादंबरीला त्यांनी वेगळे रूप दिल्याचे म्हटले जाते. त्यांच्या कलाकृतीवर देश-विदेशात चर्चा झाल्या. हिंदीतले सध्याचे सर्वाधिक चर्चित नाव असाही त्यांचा गौरव होतो. त्यांच्या साहित्य संपदेचे देश-विदेशातील अनेक भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत.

कशी उघड झाली घटना?

लेखक आणि सुप्रसिद्ध अभिनेते मानव कौल यांनी नुकतीच विनोद कुमार शुक्ल यांची भेट घेतली. त्यांनी शुक्ल यांच्यासोबत गप्पा मारल्या. त्यावेळी त्यांना माहिती समजली. शुक्ल म्हणाले की, सुप्रसिद्ध अशा राजकमल आणि वाणी प्रकाशन यांना माझ्या दोन्ही पुस्तकांच्या नव्या आवृत्त्या काढू नये, अशी वारंवार तोंडी आणि लेखी विनंती केली. मात्र, ते काही ऐकत नाहीत. त्या आवृत्त्यांमध्ये भरमसाठ चुका असतात. शिवाय त्यांनी ही पुस्तके ऑनलाइनही आणली आहेत. त्यांच्याशी झालेल्या या गप्पा कौल यांनी एक पोस्ट करून शेअर केल्या. त्यामुळे या बड्या प्रकाशकांनी सुरू केलेली लूट समोर आलीय.

काय म्हणतात कौल?

मानव कौल आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, या देशातील सर्वात मोठा लेखक…गेल्या वर्षी वाणी प्रकाशनने त्यांची 3 पुस्तके प्रसिद्ध केली. त्याचे शुक्ल यांना फक्त 6 हजार रुपये मिळाले. राजकमल प्रकाशनने वर्षभराचे फक्त 8 हजार रुपये दिले. म्हणजे काय, तर देशाचा सर्वात मोठा लेखक वर्षभरात फक्त 14 हजार रुपये कमावतो. त्यांनी पत्रव्यवहार केला, तर त्यांना कित्येक महिने उत्तर दिले जात नाही. शुक्ल यांनी आपली पुस्तके प्रकाशित करू नका, असे लेखी कळवले आहे. मात्र, त्यांना कोणीही प्रतिसाद देत नाही. या पोस्टनंतर हिंदीतले तरुण लेखक आशुतोष भारद्वाज यांनी शुक्ल यांच्याशी संपर्क साधला. त्यांनीही एक पोस्ट लिहिली.

भारद्वाज काय म्हणतात?

आशुतोष भारद्वाज आपल्या पोस्टमध्ये शुक्ल यांच्या भेटीचा वृत्तांत सांगताना म्हणतात, माझी विनोद कुमार शुक्ल यांच्याशी दीर्घ चर्चा झाली. त्यांनी रॉयल्टी स्टेटमेंट आणि प्रकाशकांसोबत केलेला पत्रव्यवहार मला दिलाय. त्यांच्या इच्छेनुसार मी हे सार्वजनिक करत आहे. वाणी प्रकाशनने त्यांची तीन पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यात दीवार में एक खिडकी रहती थी, अतिरिक्त नहीं, कविता चयन. दोन पुस्तकांची ई-बुक आवृत्तीही काढलीय. मे 1996 ते ऑगस्ट 2021 म्हणजे या 25 वर्षांत वाणी प्रकाशनाकडून त्यांना फक्त 1 लाख 35 हजार रुपये मिळालेत. म्हणजे वर्षाला जवळपास 5 हजार रुपये. त्यात एका साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेल्या पुस्तकाचा समावेश आहे. हे पुस्तक लाखो वाचकांच्या घरी तुम्हाला सहज मिळेल. राजकमल प्रकाशनने त्यांची सहा पुस्तके प्रसिद्ध केली आहेत. त्यात हरी घास की छप्पर वाली झोपडी और बौना पहाड, नौकर की कमीज, सब कुछ होना बचा रहेगा, कविता से लम्बी कविता, प्रतिनिधी कवितायँ, कभी के बाद अभी (नुकतीच सातवी आवृत्ती प्रसिद्ध). त्या शिवाय काही ई-बुकच्या आवृत्त्याही प्रसिद्ध केल्या आहेत. राजकमल प्रकाशनने शुक्ल यांना एप्रिल 2016 ते मार्च 2020 पर्यंत या साऱ्या पुस्तकांचे फक्त 67 हजार रुपये दिलेत. म्हणजे दरवर्षी फक्त 17 हजार रुपये. त्यातही विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून रॉयल्टी स्टेटमेंटमध्ये त्यांच्या कभी के बाद अभी या कविता संग्रहाचा साधा उल्लेखही नाही.

माझी पुस्तके छापू नका…

आशुषोत भारद्वाज म्हणतात की, सर्वात जास्त वेदनादायी हे आहे की, विनोद कुमार शुक्ल हे गेल्या सहा वर्षांपासून प्रकाशकाला माझी पुस्तके प्रकाशित करू नका असे वारंवार लिहितायत. माझ्या परवानगीशिवाय कुठलेही पुस्तक छापू नका. त्यात व्याकरणाच्या अनेक चुका रहात आहेत. माझा करार समाप्त करावा. मात्र, त्यावर कोणीही काहीही बोलत नाही. या ज्येष्ठ लेखकाची वेदना समजून घेण्यासाठी त्यांनी सप्टेंबर 2019 मध्ये प्रकाशकांना लिहिलेले हे पत्र वाचा. ‘मी आपल्याला स्पीडपोस्ट केले आणि ई-मेल पाठवूनही माझी पुस्तके छापू नका, असे कळवले. मात्र, तरीही आपण माझ्या पुस्तकांची नवी आवृत्ती काढली. याबाबत मी तुम्हाला फोनही केला होता. फोनवरही माझी पुस्तके प्रकाशित करू नका, अशी विनंती केली. त्यानंतरही आपण नवी आवृत्ती काढली. यापूर्वीही तुम्ही माझ्या पुस्तकाच्या जितक्या आवृत्ती काढल्या त्याची पूर्वकल्पना मला दिली नाही. यामुळे मी अतिशय दुःखी आहे.’ शुक्ल म्हणतात की, प्रकाशकांसोबत मी ई-बुकसाठी कसलाही करार केला नाही. मात्र, प्रकाशक ई-बुकही प्रकाशित करत आहेत. यानंतर अनेक तरुण लेखकांनी विनोद कुमार शुक्ल यांच्याशी संवाद साधला. त्यांनाही त्यांनी हेच सांगितले.

100 लेखक मैदानात

ज्येष्ठ लेखक विनोद कुमार शुक्ल यांच्या समर्थनार्थ हिंदीतील तरुण लेखकांनी जस्टीस फॉर विनोद कुमार शुक्ल हे अभियान सुरू केले आहे. तर 100 ज्येष्ठ लेखक त्यांच्या पाठिशी उभे राहिलेत. त्यात सुप्रसिद्ध लेखक आणि कवी अशोक वाजपेयी, प्रतगतीशील लेखक संघाचे कार्यकारी अध्यक्ष विभुती नारायण राय, ज्येष्ठ कथाकार ममता कालिया, कला समीक्षक प्रयाग शुक्ल देवेंद्र मोहन, गिरधर राठी, सुरेश सलील, हरीश करचंदानी, स्वप्नील श्रीवास्तव, कौशल किशोर, राकेद वेदा, विजय शर्मा, मीता दास, अवधेश श्रीवास्तव, उर्मिला शुक्ल, रजनी गुप्त, विभा राणी, निर्मला भुराडिया, आशुतोष भारद्वाज, मानव कौल, लीना मल्होत्रा, प्रज्ञा रावत, चंदन पांडेय, भरत तिवारी, अनिल करमेले, पल्लवी प्रकाश या दिग्गज लेखकांचा समावेश आहे. या साहित्यिकांनी हिंदीतील मोठ्या लेखकावरील अन्याय सहन करणार नसल्याचा इशारा दिला आहे. त्यांनी लेखकाच्या होणाऱ्या शोषणाचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवलाय. आता यानंतर तरी प्रकाशक जागे होणार का, असा प्रश्न शिल्लक आहे.

विनोद कुमार शुक्ल यांचे साहित्य

कविता संग्रह

– लगभग जयहिंद

– वह आदमी चला गया नया गरम कोट पहिनकर विचार की तर

– सब कुछ होना बचा रहेगा

– अतिरिक्त नहीं

– कविता से लंबी कविता

– आकाश धरती को खटखटाता है

– पचास कविताएँ

– कभी के बाद अभी

– कवि ने कहा

– प्रतिनिधि कविताएँ

कादंबरी

– नौकर की कमीज़

– खिलेगा तो देखेंगे

– दीवार में एक खिड़की रहती थी

– हरी घास की छप्पर वाली झोपड़ी और बौना पहाड़

– एक चुप्पी जगह

कथासंग्रह

– पेड़ पर कमरा

– महाविद्यालय

– एक कहानी

– घोड़ा और अन्य कहानिया

इतर पुस्तके

– गोदाम

– गमले में जंगल

– मुलांच्या कवितांचे पोस्टकार्ड प्रकाशित

इतर बातम्याः

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.