
ऐन निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील पक्षांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरु आहे. या वादाची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. यावर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी भाष्य केलं आहे. ज्येष्ठ मंडळी, आमचे कारभारी यांनी या लोकांना अशा कॉमेंटपासून थांबवलं पाहिजे. नंतर त्यावर बोलता येईल. त्या विधानाशी आमचा संबंध नाही, असे होऊ शकत नाही. आपसात भांडणाचा फायदा विरोधी पक्ष घेणार आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन सूचना द्यायला हवं. सर्वांनी आपआपल्या भागात लक्ष द्यायला हवं, असं भुजबळ म्हणालेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर असणार छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उग्घाटनानंतर केवळ आठच महिन्यात कोसळला. त्यावरही छगन भुजबळांनी भाष्य केलं आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी मागितली आहे. पुतळा लावण्याचं काम नौदलाने केलं आहे. हे खातं केंद्रात अख्त्यारित येतं. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली आहे. अजून काय करावं? नौदलाला दोष देऊन उपयोग नाही. ते सुरक्षेसाठी आहेत. पुतळ्याची देखभाल हे त्यांचं काम नाही. त्यांची चूक झाली त्यांनी मान्य केली. आता अजून काय करायला हवं? हे विरोधकांनी सांगावं. ज्यांनी लक्ष दिलं नाही त्यांच्यावर कारवाई केली जात आहे, असंही छगन भुजबळ म्हणाले.
नाशिकच्या इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर हे राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालं आहे. अजित पवारांनी काल पदाधिकारी बैठकीत बोलताना खोसकरांच्या नावाचा उल्लेख केला. त्यावरही भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. हिरामण खोसकर आमचा कार्यकर्ता आहे. ती जागा काँग्रेसची होती. म्हणून त्याला तिकडे तिकीट देऊन निवडून आणलं होतं. तिथे आता काय परिस्थिती हे माहीत नाही आणि माहिती असली तरी सांगणार नाही, असं ते म्हणालेत.
3 हजार मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस आपल्या राज्याच्या बॉर्डरवर पडत होता. जे पाणी गुजरात आणि समुद्राला मिळत होतं. ते पाणी आम्ही अडवलं. ते पाणी आणण्यासाठी डोंगराला बोगदा पाडून ते आम्ही पूनेगावपर्यंत आणलं. मात्र पुनेगव पर्यंत पाणी आणल्या नंतरदेखील ते येवलापर्यंत येत नव्हतं. या नंतर त्या कालव्याला 160 किलोमीटर आम्ही सिमेंट कोटिंग केलं. ते सोडलेले पाणी 160 किलोमीटरवर असलेल्या डोंगरगावं येथे हे पाणी आलं. जलसंपदा विभागाच्या चौकशीनंतर सरकार गेलं अशा अनेक अडचणी होत्या. त्या नंतर माझ्या 17 वर्षाच्या प्रयत्ना नंतर हे पाणी आलं. माझे अनेक ड्रीम प्रोजेक्ट होते. त्यापैकी हादेखील माझा हा महत्वाचा प्रकल्प होता. तो पूर्ण झाला, असं भुजबळांनी म्हटलं आहे.