मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाबाबत आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, अडचणी वाढणार?
मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत जाऊन आंदोलन करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र त्यांनी वाटेतच आपलं आंदोलन मागे घेतलं. आता यावरून आरोप -प्रत्यारोपाच्या फैरी झडत असून, मोठा आरोप करण्यात आला आहे.

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी उपोषणाला सुरुवात केली होती. अंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण केलं. मात्र जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर तोडगा न निघाल्याने अखेर त्यांनी पुन्हा एकदा मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला, आपण मुंबईला जाऊन आंदोलन करणार अशी घोषणा त्यांनी केली होती. ते मुंबईच्या दिशेनं निघाले देखील होते. मात्र वाटेतच प्रकृती बिघडल्यामुळे अखेर त्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं. सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांनी भेट घेतली, या भेटीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं. दरम्यान त्यानंतर आपण आता आरक्षणासंदर्भातील मागण्या मान्य करण्यासाठी सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिला असल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आला आहे.
यावर बोलताना आता ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. नवानाथ वाघमारे यांच्या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. सरकारने जरांगे यांना मागण्यांची पूर्तता करण्यासाठी एक वर्षाची मुदत दिली आहे, पण 3 महिन्याची मुदत असल्याचं सांगत जरांगे यांच्याकडून मराठा समाजाची दिशाभूल सुरू आहे, असा मोठा गौप्यस्फोट यावेळी नवनाथ वाघमारे यांच्याकडून करण्यात आला आहे.
यावेळी बोलताना त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल देखील केला आहे. जरांगे यांनी माफिया पोसले, मोठे केले. पोलीस पोत्यात घालून मारणार असल्याचं लक्षात आल्यानंतर जरांगे पाटोद्यातून पळून आले. जरांगे सर्वात मोठे नौटंकीबाज आहेत. नौटंकी करण्यासाठीच जरांगे हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. जरांगेनी मराठा समाजाची आरक्षणाच्या नावाखाली फसवणूक केली आहे. जरांगेंनी राजकारणी लोकांकडून रसद घेऊन आंदोलन केले, असे अनेक गंभीर आरोप देखील यावेळी वाघमारे यांच्याकडून मनोज जरांगे पाटील यांच्यावर करण्यात आले आहेत.
माता माऊल्यांना किती ट्रोल करायचं हे जरांगे यांच्या पिलावळींना कळायला पाहिजे, महिलांना गलिच्छ बोलणारे शिवरायांचे मावळे कसे असू शकतात? आता मनोज जरांगे पाटील यांच्या आसपास फक्त माफियांची टोळी उरली आहे. ललिता तारख यांना ट्रोल करणाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे. जरांगेंच्या पायाखालची वाळू सरकल्याने त्यांनी डिफेंडर गाडी परत केली, असंही यावेळी नवनाथ वाघमारे यांनी म्हटलं आहे.
