ना झोप, ना विश्रांती… नवरात्रीचे 9 दिवस फक्त उभं राहायचं! ३५० वर्षांपासून सुरू असलेली ही प्रथा पाहून व्हाल थक्क

पुरुषांप्रमाणेच पूर्वी महिला देखील नऊ दिवस उभे राहून हा कडक उपवास करत होत्या. महाराष्ट्राच्या लोक परंपरेत विविध प्रकारे नवरात्रीचे व्रत केले जाते. पण नऊ दिवस, नऊ रात्री उभे राहण्याची पांडे गावाची ही परंपरा व्रतस्थ भक्ती आणि सामाजिक एकोप्याचा अनोखा संदेश देते.

ना झोप, ना विश्रांती... नवरात्रीचे 9 दिवस फक्त उभं राहायचं! ३५० वर्षांपासून सुरू असलेली ही प्रथा पाहून व्हाल थक्क
| Updated on: Sep 26, 2025 | 1:48 PM

सध्या देशभरात नवरात्रौत्सवाचा धामधूम सुरु आहे. या काळात अनेक जण उपवास करतात. पण सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यामधील पांडे गावाने जपलेली परंपरा थक्क करणारी आहे. या गावात तब्बल ३५० वर्षांपासून एक अत्यंत कडक आणि वेगळ्या पद्धतीचा उपवास केला जातो. या ठिकाणी घरातील एक व्यक्ती आपल्या नवसपूर्तीसाठी नऊ दिवस आणि नऊ रात्री जमिनीवर न बसता, केवळ उभे राहून उपवास करते. हा अनोखा उपवास केवळ उभे राहूनच नव्हे, तर तो गावातील काळभैरवनाथाच्या मंदिर परिसरात कठोर नियमांचे पालन करत केला जातो.

काळभैरवनाथाला नवस, नऊ दिवस नऊ रात्री उभं राहणं

नवरात्रीच्या घटस्थापनेपासून या उपवासाची सुरुवात होते. ग्रामस्थांच्या माहितीनुसार, गावातील लोक येथील आराध्य दैवत काळभैरवनाथाला नवस बोलतात. हा नवस पूर्ण करण्यासाठी नवसकरी व्यक्ती (व्रतस्थ) गावातील काळभैरवनाथाच्या मंदिराच्या परिसरातच उभी राहून व्रत पूर्ण करते. या व्रताचे नियम अत्यंत कठोर आहेत.

विश्रांतीचे नियम काय?

नऊ दिवस आणि नऊ रात्री नवस करणाऱ्या व्यक्तीला जमिनीवर बसण्याची किंवा झोपण्याची परवानगी नसते. तसेच विश्रांतीसाठी झोपाळ्याचा आधार असतो. विश्रांतीसाठी मंदिरात खास झोपाळ्याची व्यवस्था केलेली आहे. येथे एक पाय खाली ठेवून आणि दुसरा पाय झोपाळ्यावर ठेवून अर्धवट अवस्थेत विश्रांती घेतली जाते. त्यासोबतच चालताना किंवा उभे राहताना फक्त काठीचा आधार घेता येतो. विशेष म्हणजे जोपर्यंत उपवास पूर्ण होत नाही, तोपर्यंत जमिनीला स्पर्श करायचा नाही, असाही या व्रताचा निमय आहे. ही खूप जुनी प्रथा आहे.

या उपवासात नवस करणाऱ्याला आहारापासून ते वेशभूषेपर्यंत अनेक नियम पाळावे लागतात. उपवास करणारी व्यक्ती नऊ दिवस तिखट, मीठ आणि तेलकट पदार्थ पूर्णपणे टाळते. तसेच उपवास करणाऱ्या व्यक्ती पांढरा पोशाख परिधान करतात आणि पायात चप्पल न घालता हातात काठीचा आधार घेऊन रोज सकाळ-संध्याकाळ गावाला प्रदक्षिणा घालतात. या व्रताची महती इतकी आहे की, कामासाठी गावाबाहेर गेलेले पुरुषसुद्धा या नऊ दिवसांसाठी खास गावी परत येतात आणि उपवास करतात.

पांडे गावाची ही परंपरा आजही कायम

हेमंत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा उपवास केवळ धार्मिक कठोरता दाखवत नाही, तर तो पांडे गावातील सामाजिक एकीचे आणि सर्वधर्म समभावाचे प्रतीक आहे. या गावात कोणत्याही जाती-धर्माचे लोक हा उपवास करतात, असे ते सांगतात. यामुळे गावामध्ये सलोख्याचे वातावरण टिकून राहण्यास मदत होते. पुरुषांप्रमाणेच पूर्वी महिला देखील नऊ दिवस उभे राहून हा कडक उपवास करत होत्या. महाराष्ट्राच्या लोक परंपरेत विविध प्रकारे नवरात्रीचे व्रत केले जाते. पण नऊ दिवस, नऊ रात्री उभे राहण्याची पांडे गावाची ही परंपरा व्रतस्थ भक्ती आणि सामाजिक एकोप्याचा अनोखा संदेश देते.