Sunil Tatkare : ‘दिलगिरी व्यक्त करुन विषय संपत नाही, काहीवेळेला..’ सुनेत्रावहिनींना काँग्रेसने जे म्हटलं, त्याचा संताप तटकरेंच्या प्रत्येक शब्दातून दिसला
Sunil Tatkare : काल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या पत्रकार परिषदेत घुसून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात आपली भूमिका मांडली.

काँग्रेसने राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया म्हटलं, त्यावरुन मोठा वाद सुरु आहे. काल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या पत्रकार परिषदेत घुसून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात आपली भूमिका मांडली. “सुनेत्रा पवारांसंदर्भातील काँग्रेसच्या पोस्टचा मी निषेध करतो. काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली. त्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्या संतप्त भावना व्यक्त करत आहेत. काल रात्री उशिरा काँग्रेसने दिलगिरी व्यक्त केली. पण दिलगिरी व्यक्त करुन विषय संपत नाही. काहीवेळेला काय बोलायचं याचं भान असावं लागतं. दुर्देवाने काँग्रेसचं राज्य पातळीवरील नेतृत्व ते विसरलेलं दिसतय” असं सुनील तटकरे म्हणाले.
“काँग्रेसने टीका केली त्यामागचं एकच कारण आहे, दादांच्या अकाली निधनानंतर दादांबद्दल असलेल्या भावना, दादांची प्रथम जयंती राज्यात पक्षापलीकडे जाऊन नागरिकांनी, शेतकऱ्यांनी साजरी केली. आज वहिनी ज्या पद्धतीचं काम करतायत त्यामुळे काँग्रेसच्या भवितव्याची चिंता असणारी मंडळी अशी टीका टिप्पणी करत राहणार. आम्ही काम करत राहू” असं सुनील तटकरे बोलले.
म्हणून त्यांनी दिलगिरी व्यक्त केली
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ऑन रेकॉर्ड म्हणाले. त्यावर सुनील तटकरे म्हणाले की, “हे काँग्रेसच्या वैचारिक दिवाळखोरीचं उत्तम उदहारण आहे. काल रात्री उशिरा काँग्रेसने टि्वट केलं. महाराष्ट्रात तीव्र संतप्त भावना काँग्रेसच्या विरोधात जातायत हे त्यांच्या लक्षात आलं. म्हणून त्यांनी दिलगिरी व्यक्त केली”
राऊतांचा फुकटचा सल्ला नको
संजय राऊत बोलले की, सुनेत्रा पवारांवर ही टीका त्या अजित पवारांच्या पत्नी आहेत म्हणून नाही तर त्या घटनात्मक पदावर आहेत म्हणून होतेय. त्यावर तटकरेंनी उत्तर दिलं. “राऊतांना हे माहित नाहीय की, वहिनी प्रशासनात प्रभावीपणे काम करतायत. आपला विचार स्पष्टपणे मांडत असतात. अनेक वेळा पत्रकारांशी संवाद होतो. त्यामुळे राऊतांच्या फुकटच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही” असं सुनील तटकरे बोलले.
पत्रकारांचा रोष कोणावर? सुनील तटकरेंचा दावा काय?
“धनंजयशी मला बोलता आलं नाही. त्याआधी कोणी व्हिडिओ पाठवला होता. शेवटी उपमुख्यमंत्री, पालकमंत्री म्हणून वहिनी बैठका घेत असतात.त्या अनुषंगाने पत्रकार येतात. तेव्हा त्यांची व्यवस्था जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयाने किंवा जिल्हा माहिती अधिकाऱ्याने करायची असते. पत्रकारांचा रोष हा जिल्हा प्रशासन आणि जिल्हा माहिती अधिकाऱ्यावर होता” असा दावा सुनील तटकरे यांनी केला. त्या बद्दल जी टिका टिप्पणी काँग्रेसने केली ती अयोग्य आहे.