
Mumbai Airport: पावसाळ्यात मुंबईच्या लोकलचे वेळापत्रक हमखास खोळंबलेले पाहायला मिळते. रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात वाहनांचे ट्रॅफिक झालेले दिसते. दरम्यान, आता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर नेटवर्क अचानकपणे ठप्प झाले आहे. अचानक नेटवर्क ठप्प झाल्याने येथे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. परिणामी येथे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष या सर्व्हर डाऊनमुळे अनेक खासगी हवाई वाहतूक कंपन्यांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे ही तांत्रिक अडचणू दूर करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न चालू असल्याचे बोलले जात आहे.
मुंबईच्या विमानतळावरील सर्व्हरच डाऊन झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे विमानांचे उड्डाणही उशिराने होत आहे. या तांत्रिक अडचणीमुळे इंडिगो, एयर इंडिया, अकासा, विस्तारा या विमान कंपन्यांना मोठा आर्थिक तसेच अन्य फटका बसत आहे. तांत्रिक बिघाडामुळे मुंबई विमानतळावर हळू हळू प्रवाशांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे आता हा तांत्रिक बिघाड दूर करून सर्व्हर पुन्हा पुर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी प्रवाशी करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईच्या या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व्हर डाऊन झाल्यामुळे चेक-इन व बोर्डिंगची संपूर्ण प्रक्रिया ‘मॅन्युअल मोड’वर वळवण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सामानाची तपासणी करण्यासाठी वेळ लागत आहे. विमानतळावर अचानक नेटवर्क फेल्युअरची समस्या निर्माण झाली आहे. हा तांत्रिक बिघाड निदर्शनास येताच आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रशासनाकडून ही अडचण दूर करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. विमानतळाची IT आणि कोअर टीमकडून नेटवर्क दुरुस्तीचे प्रयत्न सुरू आहेत. सर्वच विभागांना SOP नुसार ‘कंटिजन्सी’ प्रक्रिया राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा बिघाड नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र सर्व यंत्रणा सुरळीत चालू असतानाच अचानकच सर्व्हर ठप्प झाल्याचे सांगण्यात येत आहे. विमानतळावरील आयटी टीम नेमकी अडचण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. लवकरच हा बिघाड दूर होऊन सर्व यंत्रणा पूर्ववत होईल, असे सांगितले जात आहेत. या सर्व प्रक्रियेत मात्र प्रवाशी खोळंबले असून त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.