नितेश राणे यांचा कॉक्रोच जनता पार्टीवर गंभीर आरोप; थेट पाकिस्तान कनेक्शन समोर आणलं
नितेश राणे यांनी कॉक्रोच जनता पार्टीवर गंभीर आरोप केला आहे. त्यांनी सीजेपी आंदोलनात पाकिस्तान समर्थक आंदोलनात होते, असा आरोप केलाय.

कॉक्रोच जनता पार्टीच्या छत्रपती शिवाजी पार्कातील आंदोलनावरून राजकारण तापलं आहे. सीजेपीच्या आंदोलनातून दिपकेंनी भाजपवर जोरदार निशाणा साधला होता. दिपकेंनी टीका केल्यानंतर आता भाजप नेते तुटून पडल्याचे दिसून येत आहे. भाजप नेत्यांकडून कॉक्रोच जनता पार्टीवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. दिपकेंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला. त्यानंतर आता मंत्री नितेश राणेंनी गंभीर आरोप केला आहे. काँक्रोच जनता पार्टीच्या कालच्या आंदोलनात पाकिस्तान समर्थक, तुकडे-तुकडे गँगचे सदस्य होते, असं म्हणत मंत्री नितेश राणे यांनी गंभीर आरोप केला आहे.
मंत्री नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. मंत्री नितेश राणे म्हणाले, ‘ सीजेपीच्या आंदोलनात तुकडे तुकडे गँगचे सदस्य होते. शबाना आझमी, नसरुद्धीन शहा, विशाल ददलानी हे तुकडे-तुकडे गँगचे ब्रँड अॅम्बेसडर आहेत. ते काल स्टेजवर येऊन मिठ्या मारत होते. त्यांना मोठं करण्याचं काम उद्धव ठाकरे करत आहेत. कुठे बाळासाहेब ठाकरेंचे विचार, कुठे हिंदुत्वाचे विचार…इथे जिहाद्यांना चाटण्याचा काम करत असाल. तर भारत, महाराष्ट्रातील हिंदू समाज , बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम करणारा नागरिक तुम्हाला माफ करणार नाही’.
‘काल डिनो मोरियाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं. आता मला सर्वात मोठी भीती व्यक्ती करायची आहे की, दिशा सालियान प्रकरणातील एफआयआरमध्ये डिनो मोरिया, आदित्य ठाकरेंच्या नावाचा उल्लेख आहे. मिठी नदीच्या घोटाळ्यात त्याचं नाव आलं आहे. डिनो मोरिया हा नाइट लाइफ गँगचा सदस्य आहे. त्यामुळे त्याला कंत्राटे मिळायची. नाइट लाइफ गँगचा प्रमुख आदित्य ठाकरे आहे. म्हणून त्याच्या नावावर लूकआऊट नोटीस काढली पाहिजे. दिशा सालियान असो मिठी नदी घोटाळा असो….अटकेची टांगती तलवार असल्याने ते कधीही फरार होऊ शकतात. त्यामुळे लूकआऊट नोटीस काढून पासपोर्ट जप्त झाला पाहिजे, अशी माझी भूमिका असल्याचे राणेंनी सांगितले. नितेश राणे यांच्या गंभीर आरोपानंतर विरोधक काय प्रतिक्रिया देणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.