ओबीसी-मराठा आरक्षणाच्या वादात CJPची एन्ट्री; मनोज जरांगे अन् अभिजीत दीपकेंच्या भेटीवरून लक्ष्मण हाकेंचा संताप, म्हणाले, ‘तो अजून बच्चा…’
ओबीसी-मराठा आरक्षणाच्या वादात CJPची एन्ट्री झाली आहे. मनोज जरांगे आणि अभिजीत दीपकेंच्या भेटीवरून लक्ष्मण हाकेंचा संताप व्यक्त केला. त्यांनी थेट अभिजीत दीपके यांच्यावर टीका केली.

मनोज जरांगे यांच्या उपोषणाला 14 दिवस झाले आहेत. जरांगे यांचा लढा निर्णायक वळणावर आला आहे. जरांगे यांच्याकडून उद्या मुंबईत उपोषण करणार असल्याची घोषणा होऊ शकते. यासाठी जरांगे यांनी उद्या मराठा बांधवाची अंतरवाली सराटीत बैठकीचं आयोजन केलं आहे. सलग चौदा दिवसांच्या उपोषणानंतर जरांगे यांची तब्येत बिघडली. त्यामुळे सीजेपीच्या अभिजीत दीपके यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीवरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी संताप व्यक्त केला आहे. अभिजीत दीपके अजून बच्चा असल्याची टीका लक्ष्मण हाके यांनी केली आहे.
लक्ष्मण हाके यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी हाके म्हणाले, अभिजीत दिपके अजून बच्चा आहे, छोटासा कार्यकर्ता आहे आणि तो अमेरिकेतून आलाय. त्यामुळे त्याला येथील जात वर्चस्व आणि जात वास्तव माहिती नाही. आधी त्यांनी अभ्यास वाढवावा आणि दलितांची चळवळ अभ्यासावी. मनोज जरांगे यांना पाठिंबा देणे म्हणजे जात वर्चस्वाला पाठिंबा. शिवराळ गलिच्छ भाषेमध्ये महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणाऱ्या मनोज जरांगे यांना कुठल्या अर्थाने पाठिंबा अभिजीत दीपके यांनी दिला. सोनम वांगचुक यांच्या बाबतीत जे घडलं होतं, त्याला अभिजीत दिपके यांची संमती होती काय? हा छोटा पोरगा आहे. महाराष्ट्रातील वास्तव कळायला, अभ्यास करायला त्याला वेळ लागणार आहे. त्यामुळे त्याला अभ्यास वाढवावा लागेल’.
दीपकेंच्या सोनम वांगचुक आणि मनोज जरांगे पाटील यांच्या तुलनेवरून हाके म्हणाले, ‘एका बाजूला पद्मश्री पुरस्कार जिंकलेला,आयआयटी इंजिनीयर आणि शिक्षण तज्ञ तर दुसऱ्या बाजूला अर्वाच्च भाषेमध्ये शिवीगाळ करणारा मनोज जरांगे थापाड्या सोंगाड्या याची तुलना कशी होऊ शकते? सोनम वांगचूक यांची भूमिका जातीपाती पलीकडे जाऊन होती. ते देशाचे आयडॉल आहेत. पण हा अभिजीत इतके काही आयडॉल आहे काय? ओबीसीला अंडर इस्टिमेट करायच्या भानगडीत पडू नये, तसेच दिपके यांनी त्याला पाठिंबा देऊ नये. अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, सामाजिक न्याय के बारे मे वो कच्चा है. अभिजीत दिपके यांनी संघर्ष करण्याच्या भूमिकेत यावं, खमंग प्रसिद्धीच्या मागे लागू नये, मनोज जरांगे यांची प्रसिद्धी तुमच्या कोणत्याही कामाची नाही. शिक्षणावर आणि भ्रष्टाचार बोलण्याच्या भूमिकेला आम्ही पाठिंबा दिलाय, मात्र झुंडशाहीची भाषा बोलणाऱ्या जरांगेंच्या नादी तुम्ही लागू नये हा आमचा सल्ला आहे. अभिजीत दिपके पुन्हा पुन्हा तेच करत राहिले, तर त्यांनाही आम्ही सोडणार नाही, असा थेट इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला.