वाल्मिक कराडच्या टेबलावर कातडं, हाडं अन् रक्त…, कोणाला गाड्या गिफ्ट केल्या? जुन्या सहकाऱ्यानं सगळं सांगितलं

मोठी बातमी समोर येत आहे, वाल्मिक कराडच्या अडचणी आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. जुन्या सहकाऱ्याकडून त्याच्यावर गंभीर आरोप करण्यात आला आहे.

वाल्मिक कराडच्या टेबलावर कातडं, हाडं अन् रक्त..., कोणाला गाड्या गिफ्ट केल्या? जुन्या सहकाऱ्यानं सगळं सांगितलं
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 02, 2025 | 3:13 PM

अजय काळुकटे, बीड प्रतिनिधी : मोठी बातमी समोर येत आहे, वाल्मिक कराडच्या अडचणी आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. वाल्मिक कराडचे जुने सहकारी विजयसिंह बांगर यांनी कराडवर खळबळजनक आरोप केले आहेत. माझ्यासमोर वाल्मीक कराडने तिघांना मारलं, त्याचा मी साक्षीदार आहे. महादेव मुंडेंना मारल्यानंतर वाल्मीक कराडच्या टेबलवर त्याचं कातडं, हाड आणि रक्त आणून ठेवलं होतं. संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वीच तुला एका सरपंचाच्या खुनात अडकवणार अशी वाल्मिकने धमकी दिली होती, असा आरोप बांगर यांनी केला आहे. आपण यासंदर्भातील सर्व पुरावे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस अधिक्षकाकडे देणार , असल्याचंही बांगर यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले बांगर? 

वाल्मीक कराड याचे जुने सहकारी विजयसिंह (बाळा) बांगर हे वाल्मीक कराड पासून दूर झाल्यानंतर वाल्मीकने माझ्यासोबत काम कर असा हट्ट धरला होता. मात्र विजयसिंह बांगर यांनी त्यास नकार दिल्यामुळे त्या दोघांमध्ये खटके उडायला सुरुवात झाली होती. यानंतर आज विजयसिंह बांगर यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वीच तुला एका सरपंचाच्या खुनात अडकवणार अशी वाल्मिकने  फोनवरून मला धमकी दिली होती ,असा दावा बांगर यांनी केला आहे. महादेव मुंडे यांना मारल्यानंतर वाल्मिक कराडच्या टेबलावर त्यांचं कातडं, हाड आणि रक्त आणून ठेवलं होतं. यानंतर वाल्मिक कराडने मारणाऱ्यांना शाबासकी दिली आणि गाड्याही गिफ्ट दिल्या, असा गौप्यस्फोट बांगर यांनी केला आहे.

त्यांनी पत्रकार परिषदेदरम्यान एक कॉल रेकॉर्डिंग देखील ऐकवली, यामध्ये वाल्मीक कराड एका व्यक्तीला आता सगळ्यांचीच मदत घेतो तू कोण रे कुत्रा अशा प्रकारची भाषा वापरत पुढे जातीवाचक शिवीगाळ केली आहे.  या कॉल रेकॉर्डिंग संदर्भात बांगर यांनी बोलताना सांगितले की एका व्यक्तीने वाल्मीक कराडकडे कामासाठी 25 लाख रुपये दिले होते. मात्र तो परत देत नसल्याने वारंवार फोन केला होता त्याचा राग आला आणि यानंतर त्याने शिवीगाळ केली, तसेच त्याला बोलावून घेऊन पाच लाख रुपये दिले आणि खंडणीच्या गुन्ह्यात अडकवले. जसे मला एका खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मीक कराडनेच अडकवले होते, असाही आरोप त्यांनी यावेळी केला आहे.