लक्ष्मी पूजनाच्या शुभ मुहूर्तावर देवगडचा हापूस पुणे मार्केटला रवाना
हापूस आंब्याच्या सिझनला सुरुवात होण्याआधीच सिंधुदुर्ग येथील हापूस आंब्याने लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्तावर पुण्याचे मार्केटमध्ये आगमन केले आहे.

आंब्याला फळांचा राजा म्हटले जाते. त्यात कोकणचा राजा हापूस तर अविट गोडीसाठी जगात प्रसिद्ध आहे. अस्सल मधूर चव, मनमोहक सुगंध आणि दर्जेदार गुणवत्तेसाठी प्रसिद्ध असलेल्या या देवगड हापूस आंब्याने यंदाच्या हंगामाची शुभ सुरुवात केली आहे. दिवाळी लक्ष्मी पूजनाच्या शुभ मुहूर्तावर देवगड आणि कातवण येथील पहिल्या हापूसच्या पेट्या पुण्याला रवाना झाल्या आहेत.
हापूस आंब्याला जगभरात मोठी मागणी असते. या हापसूचा खरा हंगाम एप्रिल महिन्यात सुरु होतो. मात्र, काही शेतकरी प्रयोग करुन या फळांना आधीच मार्केटमध्ये पोहचवतात. अशाच प्रकारे देवगडचे हे सुमधूर चवीचे फळ हंगामा आधीच पुण्याच्या मार्केटमध्ये रवाना झाले आहे.
लक्ष्मीपूजनाच्या मंगलमय मुहूर्तावर देवगड येथील वीरेंद्र दत्तात्रय कांबळी तसेच कातवण येथील शेतकरी दिलीप राजाराम तर्फे यांच्या हापूस आंब्याच्या पहिल्या पेट्या पुणे बाजारपेठेसाठी रवाना करण्यात आल्या आहेत. हंगामाला अधिकृत सुरुवात होण्यापूर्वीच देवगड हापूसने पुणे मार्केटमध्ये एंट्री केल्याने आंबा उत्पादक आणि व्यापारी वर्गात उत्साहाचे वातावरण आहे.
वीरेंद्र कांबळी यांच्या माध्यमातून सहा डझन क्षमतेच्या एकूण तीन पेट्या, तर शेतकरी दिलीप तर्फे यांच्या माध्यमातून पाच डझनची एक आणि साडेपाच डझनच्या तीन पेट्या पुण्याला पाठविण्यात आल्या आहेत. प्रणीत मांजरेकर यांच्या साई आंबा ट्रान्सपोर्टद्वारे या पेट्या पुण्यातील गुलटेकडी मार्केट येथील मे. नामदेव रामचंद्र भोसले (एन.आर.बी., गाळा क्रमांक ९०५/९०६ ) येथे रवाना करण्यात आल्या आहेत.
देवगड हापूसची वैशिष्ट्यपूर्ण चव, सुगंध आणि दर्जा यामुळे पुण्यासह देशातील विविध बाजारपेठांमध्ये त्याला विशेष मागणी असते. पुणे ही हापूसची महत्त्वाची बाजारपेठ असल्याने यंदाच्या हंगामातील पहिल्या पेट्यांना व्यापारी वर्गाकडून कसा प्रतिसाद मिळतो आणि किती बाजारभाव मिळतो, याकडे आंबा उत्पादकांचे लक्ष लागले आहे.
लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावर झालेली ही पहिली पाठवणी देवगडच्या आगामी आंबा हंगामाची गोड चाहूल ठरली असून, यंदा शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन आणि समाधानकारक बाजारभाव मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.