महापुराचा फटका, कोट्यवधीचं धान्य सडलं, कृषी विद्यापीठाला खत बनवण्यासाठी सडलेल्या तांदळासह गहू देणार

| Updated on: Sep 02, 2021 | 5:44 PM

भंडारा जिल्ह्यात गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात आलेल्या पुराचा फटका शासकीय धान्य गोदामांना बसला होता. महापुराच्या पाण्यानं शासकीय गोदामातील धान्य भिजलं होतं.

महापुराचा फटका, कोट्यवधीचं धान्य सडलं, कृषी विद्यापीठाला खत बनवण्यासाठी सडलेल्या तांदळासह गहू देणार
भंडारा शासकीय गोदाम
Follow us on

तेजस मोहतुरे, टीव्ही 9 मराठी, भंडारा: जिल्ह्यात गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात आलेल्या पुराचा फटका शासकीय धान्य गोदामांना बसला होता. महापुराच्या पाण्यानं शासकीय गोदामातील धान्य भिजलं होतं. धान्य भिजल्यामुळे काय करायचं हा प्रश्न निर्माण झाला होता. आता तब्बल एक वर्षानंतर सडलेल्या धान्याची उचल होणार आहे. कृषी विद्यापीठाला खत म्हणून भिजलेलं धान्य देण्यात येणार आहे. पाण्यात भिजल्यानं तांदूळ, गहू, साखर, डाळ, चना सडले होते.

4727 क्विंटल धान्यसाठा भिजला

भंडारा जिल्ह्यात मागील वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये आलेल्या महापुरात भंडारा येथील शासकीय धान्य गोडाऊनमधील कोट्यवधींचा 4727 क्विंटल धान्यसाठा सापडला. यामुळे तो अक्षरश: सडला आहे. हा सडलेला धान्यसाठा खाण्यायोग्य नसल्याचा अहवाल पुणे येथील तीन प्रयोगशाळेने दिल्याने तो उचलण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सडलेले धान्य उचलण्याची परवानगी राज्य शासनाने नुकतीच दिली आहे. येत्या पंधरवाड्यात हा दुर्गंधीयुक्त धान्यसाठा कृषी विद्यापीठाला अखाद्य म्हणून खत तयार करण्यास देण्यात येणार आहे.

1 कोटी रुपयांचं नुकसान

28 ऑगस्ट 2020 च्या मध्यरात्री महापुराने भंडारा शहराला वेढले. 29,30,31 ऑगस्टपर्यंत महापुराचे पाणी ओसरले नव्हते. या महापुरात अनेक घरे व कुटुंब उध्वस्त झाली. त्यात शासकीय धान्य गोडाऊन मध्येही पाणी शिरल्याने तिथे असलेला तांदूळ, गहू, साखर, तुवर डाळ, चना डाळ, चना असा सुमारे 1 कोटी 18 लाखांचे 4 हजार 727 क्विंटल धान्य सापडले.

पूर ओसरल्यानंतर या गोडाऊनमधील धान्य सडलेले होते. त्यामुळे शासकीय यंत्रणेने त्यातील चांगल्या दर्जाचे धान्य वापरण्यात आणले. आणि उर्वरित धान्याचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले होते. महापुराच्या पाण्याखाली आल्याने धान्य सडले होते. त्यामुळे ते पशुपक्षी आणि मनुष्य यांच्या खाण्यायोग्य नसल्याचा अहवाल पुणे येथील तिन्ही प्रयोगशाळेने दिला. त्यानंतर सडलेल्या धान्याची उचल करण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बन्सोड यांनी जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या माध्यमातून राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला.

हा सडलेला आणि दुर्गंधीयुक्त धान्यसाठ्याची विल्हेवाट लावण्याची परवानगी राज्य सरकारने 23 ऑगस्टला दिली आहे. हा धान्यसाठा खाण्यायोग्य नसल्याने तो कृषी विद्यापीठ किंवा कृषी विभागाला अखाद्य म्हणून खत बनविण्यास देण्याची सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे येत्या पंधरवड्यात हा दुर्गंधीयुक्त धान्यसाठा उचलण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बन्सोड यांनी दिली आहे.

किती धान्यसाठा सडला

तांदूळ 2991.68 क्विंटल,
गहू 1228 क्विंटल,
साखर 144.03 क्विंटल,
तूर डाळ 201.72 क्विंटल,
चना डाळ 155.50 क्विंटल,
चना 6.32 क्विंटल

इतर बातम्या:

नुकसान झालेला एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही, धनजंय मुंडेंकडून शेतकऱ्यांना धीर 

नाशिकमध्ये मनपा आणि मूर्तीकारांचा पुढाकार, पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी ‘माझा बाप्पा’ उपक्रम

Bhandara Flood last year grain drown in water now gave to Agriculture University for making fertilizer