हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रीमंडळ विस्ताराची शक्यता?, सुधीर मुनगंटीवार म्हणाले,…

| Updated on: Nov 21, 2022 | 4:11 PM

ये पब्लिक है सब जानती है, असे म्हणत शिवसेनेने केलेल्या कृत्याचा जनता धडा शिकवेल असेही मुनगंटीवार म्हणाले.

हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रीमंडळ विस्ताराची शक्यता?, सुधीर मुनगंटीवार म्हणाले,...
सुधीर मुनगंटीवार
Follow us on

चंद्रपूर – राज्य मंत्रीमंडळ विस्तार रखडला आहे. तो हिवाळी अधिवेशनापूर्वी होण्याची शक्यता कमी आहे. यावर प्रतिक्रिया देताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी योग्य वेळी, योग्य क्षणी मंत्रीमंडळ विस्तार होईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे. विस्तार झाला नसला तरी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री जनहिताचे, धोरणात्मक निर्णय घेत असतात. केंद्रीय नेतृत्वाशी समन्वय साधून मंत्रीमंडळ विस्तार लवकरच होईल, असेही ते म्हणाले.

तुषार गांधी यांनी ताज्या वक्तव्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शेवटच्या दिवसांमध्ये महात्मा गांधींचे मारेकरी गोडसे यांना बंदूक पुरविली होती, असा आरोप केला. त्यावर प्रतिक्रिया देताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसला हे आज का सुचलं असा सवाल केला.

तुम्ही हे कोर्टात का मांडलं नाही, असा प्रश्न करत सावरकरांनी स्वातंत्र्य लढ्याला दिलेली प्रेरणा काँग्रेसला कधीच रुचली नाही असे मत व्यक्त केले. शहीदे आजम भगतसिंग यांची फाशी थांबवण्यासाठी काँग्रेसने काहीही केले नाही हा इतिहास आहे. मात्र अफजल गुरु या दहशतवाद्याची फाशी थांबवण्यासाठी धावाधाव केल्याचा दाखला त्यांनी दिला.

शिवसेना नेते संजय राऊत यांची सकाळी होणारी पत्र परिषद पुन्हा एकदा सुरू झाली आहे. नव्या पत्रपरिषदेत त्यांनी मुख्यमंत्री व 40 आमदारांवर सडकून टीका केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राऊत यांच्या वक्तव्याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचे मत व्यक्त केले.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान त्यांनी सावरकरांवर केलेल्या अभद्र टीकेवर राऊत यांनी कुठलेही भाष्य केले नाही. आता दुसरीकडे लक्ष वळविले जात असल्याचेही ते म्हणाले. ये पब्लिक है सब जानती है ,असे म्हणत शिवसेनेने केलेल्या कृत्याचा जनता धडा शिकवेल असेही मुनगंटीवार म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज अपमान प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे. त्यामुळे यावर अधिक बोलण्यापेक्षा अफजलखानाच्या थडग्याचं उदात्तीकरण थांबवणे औरंगाबादचे संभाजीनगर करणे असे सर्व निर्णय आमच्या काळात झाले आहे यावरून काय ते समजा असेही मुनगंटीवार म्हणाले. सूर्य चंद्र असेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आमचे हिरोच राहतील असेही त्यांनी ठामपणे सांगितले.