त्याला कोणाचीच पर्वा..; अक्षय खन्नाबद्दल अर्शद वारसी स्पष्टच म्हणाला..
'धुरंधर'मुळे चाहत्यांमध्ये लोकप्रिय ठरणारा अभिनेता अक्षय खन्ना आता काही वादांमुळेही चर्चेत आला आहे. 'दृश्यम 3'च्या निर्मात्यांनी अक्षयवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा दिल्यानंतर आता अर्शद वारसीची प्रतिक्रिया समोर येत आहे.

सध्या सोशल मीडियावर ‘धुरंधर’ स्टार अक्षय खन्नाचीच जोरदार चर्चा आहे. रेहमान डकैतच्या भूमिकेतून त्याने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. इतक्या वर्षांनंतर अक्षयला मिळणारं यश पाहून चाहतेही खुश झाले आहेत. अक्षयला अधिकाधिक चित्रपट मिळावेत आणि त्याचं दमदार अभिनय आणखी मोठ्या पडद्यावर पहायला मिळावं, अशी इच्छा चाहते व्यक्त करत आहेत. परंतु अशातच ‘दृश्यम 3’ या चित्रपटामुळे अक्षय खन्ना वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. मानधनाच्या कारणास्तव त्याने अचानक या चित्रपटातून माघार घेतल्यानंतर निर्माते कुमार मंगत पाठक यांनी त्याच्याविरोधात थेट कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. यशाची हवा त्याच्या डोक्यात गेली आहे, अशा शब्दांत त्यांनी टीका केली. या वादादरम्यान आता अभिनेता अर्शद वारसी अक्षयच्या स्वभावाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला आहे.
‘द लल्लनटॉप’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत अर्शदला अक्षयसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता, याविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला, “अक्षय खूप सीनिअर आहे. अभिनेता म्हणून तो खूप चांगला आहे, अगदी सुरुवातीपासूनच. यावर कोणीच शंका घेऊ शकत नाही. परंतु तो त्याच्याच विश्वात मग्न असतो. त्याला दुसऱ्या कोणाचीच पर्वा नसते. त्याचं एक वेगळं आयुष्य आहे. तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता, विचार करता का नाही.. ही तुमची समस्या आहे, माझी नाही.. या मताचा तो आहे. तो आपल्या हिशोबाने त्याचं आयुष्य जगतो.”
“त्याला कधीच कोणत्या पीआरची (पब्लिक रिलेशन) गरज पडली नाही. तो सुरुवातीपासून असाच आहे. अक्षय नेहमीच त्याच्या आयुष्यात असाच राहिला आहे”, असं अर्शदने स्पष्ट केलं. अक्षय आणि अर्शद यांनी ‘हलचल’ आणि ‘शॉर्टकट’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंय. दरम्यान ‘दृश्यम 3’मध्ये अभिनेता जयदीप अहलावतने अक्षय खन्नाची जागा घेतली आहे. पुढच्या वर्षीपासून या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. अक्षयने ऐनवेळी नकार दिल्याने बरंच नुकसान झाल्याचा खुलासा निर्मात्यांनी एका मुलाखतीत केला होता. त्यामुळे त्यांनी अक्षयला कायदेशीर नोटीससुद्धा बजावली आहे.
