
Chandrapur Farmer Kidney: चंद्रपूरमधून माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना पुढे आली आहे. कर्जाचा परतावा करण्यासाठी सावकारांनी शेतकऱ्याला किडनी विकायला लावली.या क्रूर प्रकाराणे महाराष्ट्र हादरला आहे. नागभीड तालुक्यामधील मिंथुर गावात हा प्रकार घडला आहे. बळीराजाची वेदना बघून दगडालाही पाझर फुटेल. मात्र सरकार, प्रशासनाला बळीराजाचे आभाळाएवढे दुःख कधी दिसलेच नाही. केवळ आकड्याचा खेळ पुढे ठेवून सरकार टाळ्या पदरी पाडत असते. चंद्रपूर जिल्हातील या कर्जबाजारी शेतकऱ्याची वेदना आभाळाला भिडणारी आहे.
रोशन कुडे यांची किडनी चोरली
सावकारी कर्जाचा जाळ्यात अडकलेल्या या शेतकऱ्याला कर्ज फेडण्यासाठी स्वतःची किडनी विकण्याचा वेदनादाई प्रसंग ओढवला. रोशन सदाशिव कुडे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते चंद्रपूर जिल्हातील मिंथुर गावातील रहिवाशी आहेत. निसर्गाला जिंकणारा बळीराजा सावकारीला पुरता हरला आहे. रोशन यांच्याकडे चार एकर शेती आहे. या शेतीवरच त्यांचा कुटुंबाच्या उदरनिर्वाह चालतो. निसर्गाचा लहरीपणामुळे शेती फायदेशीर ठरली नाही. त्यामुळे शेतीपूरक व्यवसाय करण्याचे त्यांनी ठरविले.
दुग्ध व्यवसायातून थोडी मिळकत होईल म्हणून त्यांनी दुधाळ गाई खरेदी केल्यात. यासाठी त्यांनी दोन सावकाराकडून 50-50 हजार रुपये घेतले. येथेही त्यांना नशिबाने धोका दिला. खरेदी केलेल्या गाई मरण पावल्यात.त्यात शेतीही पिकेना. कर्जाचा डोंगर वाढत गेला. सावकार घरी येऊन नको ते बोलू लागलेत.कर्जातून मुक्त होण्यासाठी त्यांनी दोन एकर जागा विकली.ट्रॅक्टर आणि घरातील सामान विकले. मात्र कर्ज काही संपेना.
8 लाखाला विकली किडनी
एक लाखाचे 74 लाखावर गेले. शेवटी कर्ज घेतलेल्या एका सावकाराने किडनी विकण्याचा सल्ला दिला. एका एजंटने रोशन कुडे यांना कलकत्ता येथे नेले. कुडे यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर कंबोडिया येथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आणि किडनी काढण्यात आली. ही किडनी कुडे यांनी आठ लाखाला विकली.
हा महाभयानक प्रकार
हा महाभयानक प्रकार आहे एक लाखाचे 74 लाख कसे झाले, असे अनधिकृत सावकार सावकारी करत असेल तर त्यांना जेलमध्ये टाकले पाहिजे, शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, आम्ही शेतकऱ्यांच्या कर्ज विषयी सरकारला बोलत राहतो. पण सरकार कानावर घेत नाही. सरकार करत आहे. कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याला किडनी विकावी लागते यासारखे दुर्दैव दुसरं कुठलं नाही. या गोष्टी महाराष्ट्रात होत आहे हे मोठे दुर्दैव आहे, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी दिली.
सरकार किती काम करते हे दिसते
किडनी विक्री प्रकारावर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी संताप व्यक्त केल आहे. यावरुन दिसते सरकार किती काम करत आहे. त्यांनी आता गंभीरपणे विचार करावा अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.