Chandrapur Tiger : चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यातील जखमी गुराख्याचा मृत्यू, जिल्ह्यातील 3 दिवसांतील वाघाचा तिसरा बळी

| Updated on: Aug 18, 2022 | 9:45 PM

या वाघाची वैद्यकीय तपासणी करून त्याला चंद्रपूरच्या वन्यजीव शुश्रुषा केंद्रात हलविले जाणार आहे. वाघ जेरबंद झाल्यानंतर ब्रह्मपुरी शहरालगतच्या शेतशिवारात नागरिक व शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.

Chandrapur Tiger : चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यातील जखमी गुराख्याचा मृत्यू, जिल्ह्यातील 3 दिवसांतील वाघाचा तिसरा बळी
चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यातील जखमी गुराख्याच्या मृत्यू
Image Credit source: t v 9
Follow us on

चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गुराख्याचा मृत्यू झाला. चंद्रपूर जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. भाऊराव गेडाम (वय 55) असं मृतक गुराख्याचे नाव आहे. मूल तालुक्यातील (Mul Taluka) करवन येथील रहिवासी असलेला भाऊराव काल मारोडा भागातील जंगलात गुरं चराई गेला होता. वाघाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला होता. त्याचा चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात (District General Hospital) आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. काल ब्रम्हपुरी तालुक्यातील अड्याळ येथे विलास रंधये (58) यांचा तर परवा ब्रम्हपुरी तालुक्यातील (Bramhapuri Taluka) दुधवाही येथे मुखरू राऊत (62) यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. चंद्रपुरात जंगलात गेलेला व्यक्ती केव्हा परत येईल, काही सांगता येत नाही. कारण वाघांची संख्या वाढल्यानं ते माणसावर हल्ला करण्यासाठी मागंपुढं पाहत नाही. अशात या घटना जास्त होताना दिसून येतात. गेल्या तीन दिवसांतली वाघाच्या हल्ल्यातील ही तिसरी घटना आहे. त्यामुळं नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आहे.

वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीच्या जंगलात हल्लेखोर ठरलेल्या नर वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आहे. टी-103 असे या नर वाघाचे नाव आहे. जून महिन्यापासून या वाघाच्या हल्ल्यात या भागात तीन मोठ्या हल्ल्यात ग्रामस्थांचा मृत्यू झाला होता. खरीप पिकांच्या पेरणी व देखभालीसाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्यांना वाघाने लक्ष्य केले होते. त्यामुळेच नागरिकांमधील संताप लक्षात घेता मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांनी 17 ऑगस्ट रोजी या वाघाला पिंजराबंद करण्याचे आदेश दिले होते.

नागरिकांनी घेतला सुटकेचा निश्वास

आज सकाळी ब्रह्मपुरी उपक्षेत्रातील जंगलातल्या भगवानपूर येथील कक्ष क्रमांक 890 मध्ये हा वाघ फिरताना आढळला होता. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रविकांत खोब्रागडे व सशस्त्र पोलीस कर्मचारी अजय मराठे यांनी नेमका डार्ट मारून अडीच वर्षाच्या या नर वाघाला बेशुद्ध केले. या वाघाची वैद्यकीय तपासणी करून त्याला चंद्रपूरच्या वन्यजीव शुश्रुषा केंद्रात हलविले जाणार आहे. वाघ जेरबंद झाल्यानंतर ब्रह्मपुरी शहरालगतच्या शेतशिवारात नागरिक व शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.

हे सुद्धा वाचा