Satara Landslide : मध्यरात्री 2 वाजता डोंगराचा भाग कोसळला, घरं दबली, 12 मृत्यू, साताऱ्याच्या संपूर्ण घटनेचा थरार

| Updated on: Jul 23, 2021 | 11:46 PM

आंबेघरच्या गावकऱ्यांनी कधीही विचार न केलेलं संकट अचानक मध्यरात्री त्यांच्यावर ओढावलं. पाऊस वैरी होऊन कोसळला आणि नियतीने साथ सोडली.

Satara Landslide : मध्यरात्री 2 वाजता डोंगराचा भाग कोसळला, घरं दबली, 12 मृत्यू, साताऱ्याच्या संपूर्ण घटनेचा थरार
आंबेघरच्या गावकऱ्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला
Follow us on

सातारा : आपल्या नशिबात नियतीने काय लिहून ठेवलंय याची कुणालाही कल्पना नसते. पण कधीकधी नियती प्रचंड क्रूरपणे वागते. त्याचा प्रत्यय साताऱ्यातील आंबेघरच्या गावकऱ्यांना आला आहे. संपूर्ण गाव गुरुवारी रात्री गाढ झोपेत होतं. हे गाव दुर्गम आणि डोंगराळ भागात आहे. डोंगराच्या पायथ्याशी ते वसलेलं आहे. पण गावावर डोंगर कोसळेल असा विचार कधीच कुणाच्या मनात देखील आला नाही. उलट हा भलामोठा डोंगरच आपलं संगोपन करतो. त्याच्या अंगखांद्यावर खेळून आपल्या अनेक पिढ्या लहानाच्या मोठ्या झाल्या, अशी गावकऱ्यांची भावना होती. पण नियतीने घात केला आणि एका दुर्घटनेमुळे 12 जणांचा बळी गेला.

आंबेघरच्या गावकऱ्यांनी कधीही विचार न केलेलं संकट अचानक मध्यरात्री त्यांच्यावर ओढावलं. पाऊस वैरी होऊन कोसळला आणि नियतीने साथ सोडली. ज्या डोंगराने इतके चांगले क्षण, आठवणी दिल्या त्याच डोंगराचा भलामोठा भाग मुसळधार पावसामुळे मध्यरात्री दोन वाजता पायथ्याशी असलेल्या काही घरांवर कोसळला. आणि मोठी दुर्घटना घडली. झोपेत असलेले अनेक निष्पाप जीव अचानक आलेल्या या संकटात कायमचे झोपी गेले. या दुर्घटनेमुळे फक्त साताराच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. दरडीच्या ढिगाऱ्याखाली आणखी 15 ते 16 जण दबल्याची भीती स्थानिकांनी वर्तवली आहे.

नेमकं काय घडलं? आंबेघरच्या स्थानिकांनी सांगितला थरार

आंबेघरमध्ये काल (22 जुलै) दिवसभर मुसळधार पाऊस पडला. रात्रीदेखील पाऊस सुरुच होता. आंबेघरचे गावकरी रात्री गाढ झोपेत होते. या गावकऱ्यांना पुढे नियतीने काय वाढून ठेवलंय याची काहीच कल्पना नव्हती. दरवर्षीप्रमाणे पाऊस पडतोय. त्यामुळे अशा दुर्घटनेचा विचार कुणाच्याही मनात आला नव्हता. पण मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास अनपेक्षित अशी मोठी दुर्घटना घडली. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या काही घरांवर डोंगराचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत घरे दबली आणि अनेकांचा संसार उद्ध्वस्त झाला.

दरड कोसळल्यानंतरची परिस्थिती

दरड कोसळल्यामुळे गावात एकच गदारोळ झाला. दुसरीकडे पाऊस प्रचंड पडत होता. त्यामुळे डोळ्यादेखत आपली माणसं दरडीखाली दबली गेलीय पण त्यांना वाचवायचं कसं, काय कारयचं? या विचारांनी गावातील नागरिकांचा जीव तुटत होता. मात्र, अशाही परिस्थितीत गावातील काही तरुणांनी बचावकार्य सुरु केलं. पण त्यांच्याकडून एवढामोठा ढिगारा दूर कसा सारला जाणार? असा प्रश्न होता. कारण घरांवर मोठ्या प्रमाणात माती आणि मोठमोठी दगडं होती. अखेर प्रशासनाला या घटनेची माहिती दिली. एनडीआरएफची एक टीम घटनास्थळी दाखल झाली. पण मुसळधार पावसामुळे बचाव कार्यात व्यत्यय येत होता. याशिवाय माती आणि दगडं मोठमोठ्या जेसीबीशिवाय बाजूला सारता येणार नव्हतं. पण त्या भागात परिस्थिती इतकी भीषण आहे की घटनास्थळी जेसीबी जाण्यासाठी व्यवस्था नाही, अशी माहिती एका स्थानिकाने दिलीय. बचावकार्य अद्यापही सुरु आहे. ढिगाऱ्याखाली अद्यापही 15 ते 16 जण दबल्याची भीती वर्तवण्यात आली आहे.

महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर, अनेक ठिकाणी दरड कोसळल्या

महाराष्ट्रात पावासाने प्रचंड थैमान घातलं आहे. मुसळधार पावासामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमध्ये प्रचंड भीषण परिस्थिती आहे. एकीकडे पुराचं संकट असताना दुसरीकडे पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटनादेखील समोर येत आहेत. चिपळूण आणि महाडच्या तळीये गावात घरांवर दरड कोसळल्याच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला असताना साताऱ्यातील आंबेघर गावातही दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. आंबेघरच्या या दुर्घटनेत तब्बल 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतकांचा खरा आकडा अद्याप प्रशासनाकडून जारी करण्यात आलेला नाही. दरडीच्या ढिगाऱ्याखाली आणखी 15 ते 16 जण अडकल्याची भीती स्थानिक गावकऱ्यांनी वर्तवली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.

संबंधित बातम्या:

Raigad Satara landslide live : रायगड आणि साताऱ्यात भीषण दुर्घटना, दरडी कोसळून 50 पेक्षा अधिक मृत्यू

गफुटीचा अचूक अंदाज वर्तवता येत नाही, तळीये गावात कालच मदत पोहोचली होती: उद्धव ठाकरे

Talai Landslide : महाडमध्ये माळीणची पुनरावृत्ती, काल दुपारी दरड कोसळली, आतापर्यंत काय काय घडलं?

Video : रायगडमध्ये दरड कोसळून तब्बल 32 जणांचा मृत्यू, 80 ते 90 जण मातीच्या ढिगाऱ्याखाली, नेमकं काय घडलं?