वाशिमचा युवक आफ्रिका खंडातील हे सर्वोच्च शिखर सर करणार, स्वप्नपूर्तीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून पाठबळ

| Updated on: Jul 10, 2021 | 7:29 AM

वाशिम येथील 19 वर्षीय यश मारुती इंगोले या युवा गिर्यारोहकाची निवड आफ्रिका खंडातील ‘किलीमांजारो’ (उंची : सुमारे 5892 मीटर) शिखरावर चढाई करण्यासाठी निवडलेल्या चमूमध्ये झाली आहे.

वाशिमचा युवक आफ्रिका खंडातील हे सर्वोच्च शिखर सर करणार, स्वप्नपूर्तीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून पाठबळ
Follow us on

वाशिम : वाशिम येथील 19 वर्षीय यश मारुती इंगोले या युवा गिर्यारोहकाची निवड आफ्रिका खंडातील ‘किलीमांजारो’ (उंची : सुमारे 5892 मीटर) शिखरावर चढाई करण्यासाठी निवडलेल्या चमूमध्ये झाली आहे. आफ्रिका खंडातील हे सर्वोच्च शिखर सर करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला आर्थिक मदतीची आवश्यकता होती. त्यामुळे यशने जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांना लेखी पत्राद्वारे आर्थिक मदतीची विनंती केली. शिक्षणासोबतच वेगळा छंद जोपासत यशने आतापर्यंत केलेले गिर्यारोहण आणि त्याची जिद्द पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला मदत उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला. विविध शासकीय अधिकाऱ्यांच्या सहकार्याने 8 जुलै रोजी त्याला 1 लाख 70 हजार रुपयांचा निधी सुपूर्द केला. तसेच त्याला ‘किलीमांजारो’ शिखरावर यशस्वी चढाई करण्यासाठी शुभेच्छा दिल्या (Washim collector help financially to a young mountaineer).

गिर्यारोहणाची आवड असलेल्या यश इंगोले याने यापूर्वी हिमाचल प्रदेशातील मनाली येथील अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनरिंग अँड अलाइड स्पोर्ट्स या संस्थेतून गिर्यारोहणाचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. तसेच प्रशिक्षणादरम्यान 15 हजार फुट यशस्वी चढाई केली. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील सुमारे 5400 फुट उंचीच्या ‘कळसुबाई’ या महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखरावर त्याने दोन वेळा यशस्वी चढाई केली आहे. त्याचबरोबर सह्याद्री पर्वतरांगामधील 18 किल्ले तसेच 3 समुद्री किल्ल्यांवर सुद्धा चढाई केली आहे.

कुटुंबाच्या आर्थिक परिस्थिती बेताची, जिल्हाधिकाऱ्यांकडून मदतीचा हात

आफ्रिका खंडातील सर्वोच्च ‘किलीमांजारो’ शिखरावर 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2021 या कालावधीत होणाऱ्या गिर्यारोहण मोहिमेसाठी यश इंगोले याची निवड झाली आहे. या मोहिमेसाठी त्याला सुमारे 3 लाख 54 हजार रुपये खर्च येणार आहे. कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे एकरकमी इतके पैसे जमविणे शक्य नसल्याने यशने जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांना पत्र लिहिले आणि आपल्या गिर्यारोहण मोहिमेसाठी शासनामार्फत मदतीची विनंती केली होती.

आजकाल पालक आणि मुलांकडून पुस्तकी शिक्षणाला अवास्तव महत्व दिले जात आहे. विविध कला, क्रीडा क्षेत्राकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन बदलत आहेत. अशा काळात शिक्षणासोबतच काहीतरी वेगळे करण्याची जिद्द बाळगत यश इंगोले याने गिर्यारोहणाचा जोपासलेला छंद आणि त्याने या क्षेत्रात केलेल्या कामगिरीची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली.

1 लाख 70 हजार रुपये रक्कम गिर्यारोहकाला सुपुर्द

या युवा गिर्यारोहकाला पुढील वाटचालीस प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी त्याच्या ‘किलीमांजारो’ गिर्यारोहण मोहिमेसाठी मदत उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या पुढाकारातून वाशिम, रिसोड, मंगरूळपीर, कारंजा नगरपरिषद आणि मालेगाव, मानोरा नगरपंचायतींचे मुख्याधिकारी, महावितरणचे कार्यकारी अभियंता यांच्या सहकार्याने जमा झालेली 1 लाख 70 हजार रुपये रक्कम जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते यशला सुपूर्द करण्यात आली. काही व्यापारी, व्यावसायिकांनी सुद्धा यशला मदत केली.

हेही वाचा :

Video | वाशिममध्ये दोन गटात तुफान हाणामारी; राड्याचा व्हिडीओ व्हायरल

वाशिममध्ये सुस्साट लसीकरण, ‘या’ तालुक्यात 18 वर्षांवरील 90 टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण

वाशिम जिल्ह्यात केवळ 9 टक्के लोकांना लसीचा दुसरा डोस, डेल्टा प्लस’ला कसं रोखणार?

व्हिडीओ पाहा :

Washim collector help financially to a young mountaineer