Pandharpur Well Accicent: पंढरपूर विहीर दुर्घटनेत बचावकार्याला वेग, भाजप नेत्यांनी आधीच वाहिली श्रद्धांजली; पालकमंत्री गोरेंकडून पोस्ट डिलीट
गेल्या सात तासांपासून याठिकाणी बचावकार्य सुरु आहे. सोलापूरचे सध्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी श्री. एस. कार्तिकेयन हे स्वत: घटनास्थळी उपस्थित असून त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

रवी केल्हेकर, प्रतिनिधी: Solapur Well Accident News: सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात दुर्दैवी घटना घडली आहे. शेतात विहीर खोदण्याचे काम सुरू असताना अचानक विहीर कोसळल्याने चारजण मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले. गेल्या सात तासांपासून याठिकाणी बचावकार्य सुरु आहे. सोलापूरचे सध्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी श्री. एस. कार्तिकेयन हे स्वत: घटनास्थळी उपस्थित असून त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
नेमकं काय घडलं?
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पंढरपुर तालुक्यातील आंबे येथे निवास शिंदे या शेतकऱ्याच्या शेतात विहीर खोदण्याचे काम सुरू होते. विहीर खोदताना अचानक दगड मातीचा ढिगारा काम करणाऱ्या कामगारांच्या अंगावर कोसळला. कामगारांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. हे कामगार सध्या दगड, मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याचं सांगितलं जात आहे, या सर्वांना वाचवण्यासाठी गेल्या तास तासांपासून प्रयत्न सुरु आहेत.
कामगारांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु
सोलापूरचे सध्याचे जिल्हाधिकारी श्री. एस. कार्तिकेयन तसेच माढ्याचे आमदार अभिजीत पाटील हे घटनास्थळी उपस्थित आहेत. या मजुरांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. याठिकाणी एनडीआरएफचे पथकही दाखल होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिली आहे. तसेच विठ्ठलाच्या कृपेने सर्व कामगार सुखरुप असावेत अशी भावना आमदार अभिजित पाटील यांनी व्यक्त केली आहे.
भाजप नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली!
दरम्यान, एकीकडे कामगारांना जिवंत वाचवण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी देत आहेत तर दुसरीकडे घटनेबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह भाजप नेत्यांनी मात्र असंवेदनशीलता दाखवल्याचे समोर आले आहे. कामगारांचे बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांनी मात्र कामगारांच्या मृत्यूची घोषणा केली तसेच सोशल मीडियावरुन श्रद्धांजलीही वाहिली.
भाजपाचे मंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह भाजप तालुका अध्यक्ष सुभाष मस्के , भाजपाचे माऊली हळनवर व पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या पदाधिकाऱ्यांना श्रद्धांजली वाहिली. चूक लक्षात आल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आपली पोस्टही डिलिट केली.