पंढरपुरात चंद्रभागा नदीत बुडून तीन भाविकांचा मृत्यू

धरणातून पाणी सोडल्यामुळे नदीतील पाण्याचा प्रवाह वेगाने सुरु आहे. या प्रवाहात तिन्ही महिला बुडल्या आहेत. त्यात सुनीता सपकाळ (वय 43) आणि संगीता सपकाळ (वय 40) या दोन महिला जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील आहेत.

पंढरपुरात चंद्रभागा नदीत बुडून तीन भाविकांचा मृत्यू
| Updated on: Jul 19, 2025 | 11:49 AM

पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी रोज हजारो भाविक येतात. अनेक भाविक दर्शनापूर्वी चंद्रभागा नदीत जाऊन स्नान करतात. चंद्रभागा नदीत उजनी धरणातून पाणी सोडले आहे. यामुळे नदीच्या पात्रात पाणी मोठ्या प्रमाणावर आहे. नदीच्या पात्रात स्नानासाठी गेलेल्या तीन महिला भाविकांचा शनिवारी सकाळी बुडून मृत्यू झाला आहे. त्यातील दोन महिलांचे मृतदेह सापडले आहेत. तिसऱ्या महिलेचा शोध सुरू आहे. उजनी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे सध्या चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे. भाविकांना पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडली आहे.

पाण्याचा अंदाज न आल्याने घडली घटना

विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या तीन महिला भाविक शनिवारी सकाळी चंद्रभागेत स्नानासाठी उतरल्या होत्या. जालना जिल्ह्यातील भोकरदान येथे राहणार्‍या दोन महिला आणि एक अनोळखी महिला नदीत उतरली. त्या महिलांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे चंद्रभागेत त्या बुडाल्या. पुंडलिक मंदिराजवळ ही घटना घडली. त्या महिला पाण्यात बुडत असल्याचे इतर महिलांच्या लक्षात आले. त्यामुळे मदतीसाठी आरडा ओरड सुरु केली.

दोन्ही महिला जालना जिल्ह्यातील

धरणातून पाणी सोडल्यामुळे नदीतील पाण्याचा प्रवाह वेगाने सुरु आहे. या प्रवाहात तिन्ही महिला बुडल्या आहेत. त्यात सुनीता सपकाळ (वय 43) आणि संगीता सपकाळ (वय 40) या दोन महिला जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील आहेत. तसेच एका महिलीची ओळख पटली नाही. चंद्रभागा नदीवर असलेल्या कोळी बांधवांनी या बुडालेल्या महिलांचे मृतदेह बाहेर काढला आहे. तिसऱ्या महिलेचा शोध सुरु आहे. घटनास्थळी बचाव पथकही आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

दरम्यान, सोलापूरमध्ये अंगणात खेळत असताना दोन वर्षीय चिमुकल्याचा पाण्याच्या हौदात पडून जागीच मृत्यू झाला. लाडू युवराज घाडगे असे त्या मुलाचे नाव आहे. माढ्याच्या सापटणे भोसे गावात ही घटना घडली.