‘आज मुंडे साहेब असते तर..,’ गोपीनाथ मुंडेंच्या पुण्यतिथी निमित्त पंकजा मुंडे भावूक

गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त गोपीनाथ गडावर खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी बाबांच्या आठवणींना उजाळा दिला...

आज मुंडे साहेब असते तर..,  गोपीनाथ मुंडेंच्या पुण्यतिथी निमित्त पंकजा मुंडे भावूक
| Updated on: Jun 03, 2025 | 2:45 PM

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज पुण्यतिथी आहे. यानिमित्त आज गोपीनाथ गडावर खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रीतम मुंडे, पंकजा मुंडे यांच्यासह पुतणे धनंजय मुंडे व राज्यातील अनेक नेते उपस्थिती होते. यावेळी बोलताना पंकजा मुंडे या बाबांच्या आठवणीत भावूक झाल्याचे दिसून आले, त्यांनी आपल्या भाषणात नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

पंकजा मुंडेंनी आपल्या भाषणात म्हटले की, ‘मी दरवर्षी बाबांच्या आठवणीत रक्तदान शिबीर आयोजित करते आणि मी स्व:ता रक्तदान करते. त्याचबरोबर आज वृक्षारोपण आणि इतर अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून मुंडे साहेबांच्या विचारांना जिवंत ठेवण्याचा प्रयत्न आपण करत आहोत.’

आज मुंडे साहेब असते तर…

पुढे बोलताना पंकजा मुंडे यांनी म्हटले की, मुंडे साहेबांच्या मनात सामन्य लोकांबाबतची भावना अत्यंत स्वच्छ होती, त्यामुळे त्यांचे विचार आजही जिवंत आहेत. ते पुण्यात्मा आहेत, त्यामुळे त्यांनी कधीच कुणाविषयी वाईट विचार केला नाही. त्यांनी आणखी खूप काम करायचं होतं. आज मुंडे साहेब असते तर ते देशातील अत्यंत महत्त्वाच्या पदावर असते. ते त्यांच्या सहकाऱ्यांबद्दल आपल्याला दिसले असते. पण आज ते नाहीत, मात्र मी तुमच्यात त्यांना शोधण्याचा प्रयत्न करते.

मुंडे साहेबांना तुमचे प्रेम पाहून आनंद झाला असेल

पुढे बोलताना पंकजा म्हणाल्या की, आज मुंडे साहेब आपल्यात नाहीत, मात्र ११ वर्षांनंतरही अनेक गावांमध्ये त्यांची जयंती-पुण्यतिथी साजरी केली जाते हे माझं भाग्य आहे. मी आमच्या परिवाराच्या वतीने तुमचे स्वागत करते कारण तुम्ही सर्वांनी आम्हाला बळ दिलेलं आहे. तुम्ही आज आला ते पाहून मुंडे साहेब जिथे असतील तिथे त्यांना आनंद झाला असेल.