मोठी बातमी! पार्थ पवारांच्या कंपनीला पहिला धक्का, जमीन घोटाळ्याप्रकरणी पहिली अटक

Parth Pawar Land Scam : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे काही दिवसांपूर्वी अडचणीत सापडले होते. या प्रकरणी आता शीतल तेजवानीला अटक करण्यात आली आहे. पार्थ पवारांच्या कंपनीला तेजवानीकडून बेकायदेशीरपणे जमीन विकण्यात आली होती.

मोठी बातमी! पार्थ पवारांच्या कंपनीला पहिला धक्का, जमीन घोटाळ्याप्रकरणी पहिली अटक
| Updated on: Dec 03, 2025 | 5:20 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. त्यांची अमेडिया ही कंपनी पुण्यातील एका जमीनीच्या व्यवहारामुळे अडचणीत सापडली आहे. आता या प्रकरणी शीतल तेजवानीला अटक करण्यात आली आहे. पार्थ पवारांच्या कंपनीला तेजवानीकडून बेकायदेशीरपणे जमीन विकण्यात आली होती. याप्रकरणी आता तिला अटक करण्यात आली आहे. यामुळे पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीची अडचण आणखी वाढण्याची शक्यता आहे.

शीतल तेजवानीला पुणे पोलिसांकडून अटक

मुंढवा येथील कोट्यवधीच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून समोर आलेल्या शीतल तेजवानीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील तपासाचा वेग वाढवल्यानंतर पोलिसांनी शीतल तेजवानीची याआधी दोन वेळा चौकशी केली होती. चौकशीत उघड झालेल्या बाबींवरून तिचा थेट सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यावर अखेर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

1800 कोटी रुपयांची जमीन 300 कोटींना विकली

पार्थ पवार यांच्या अमेडियाला कंपनीला पुण्यातील मोक्याची 1800 कोटी रुपयांची जमीन 300 कोटी रुपयांत मिळाली होती. या प्रकरणी शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि निलंबित उपनिबंधक रवींद्र तारुंवर या तिघांवर गुन्हा दाखल झाला होता. शीतल तेजवानी यांनी 300 कोटींच्या जमिनींच्या व्यवहारापोटी पार्थ पवार यांच्या मालकीच्या अमेडिया कंपनीकडून एक छद्दामही न घेता थेट खरेदीखत केल्याचे समोर आले होते. त्यामुळे पोलीस त्यांच्या मागावर होते.

तीन जणांवर गुन्हा दाखल

शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि निलंबित उपनिबंधक रवींद्र तारु तिघांवर मुद्रांक शुल्कात फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. शीतल तेजवानी यांच्याकडे संबंधित जागेची पावर ऑफ अॅटर्नी आहे. जमीन खरेदीखत शीतल तेजवानीने लिहून दिलं. अमेडिया कंपनीचे दिग्विजय पाटील यांनी ते लिहून घेतलं. उपनिबंधक रवींद्र तारु यांनी कागदपत्र तयार करुन दिली त्यामुळे या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता शीतल यांना अटक करण्यात आली आहे.

शीतल तेजवानी यांना अटक करण्यात आल्याने आता त्यांची कसून चौकशी करण्यात येणार आहे. यातून या जमीन व्यव्हाराप्रकरणी आणखी महत्त्वाची माहिती समोर येणार आहे. या प्रकरणी पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. मात्र आता सखोल चोकशीतून महत्त्वाची माहिती समोर आल्यानंतर त्यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे.