पूर्णेकर प्रकरणात मोठा ट्विस्ट, ती तरुणी आता तपासाच्या केंद्रस्थानी, नेमकं कनेक्शन काय?
राम पूर्णेकरांनी पोलिसांना त्यांचा जबाब दिला आहे. त्यामुळे प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी आता नवा अँगल तपासला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा जबाब तपासाला दिशा देणारा ठरणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

प्रदीप पूर्णेकर प्रकरणी आता गंभीर माहिती समोर येत आहे. मृत पूर्णेकरांचा मुलगा राम पूर्णेकर याने पोलिसांना दिलेल्या जबाबातून अनेक गोष्टींचे दावे केले जात आहेत. प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येपूर्वी आणि हत्येनंतरही एक तरुणी पप्पाच्या कार्यालयाबाहेर दिसली होती, असा दावा राम पूर्णेकरने केला आहे. एवढच नाही तर तिच्यासोबत दोन तरुणही दिसून आले होते, असा जवाब रामने नोंदवल्यामुळे आता पूर्णेकर प्रकरणाचा तपास एका नव्या अँगलने होणार असल्याचं म्हटलं जातंय. ते दोन तरुण आणि दोन तरुणींची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली गेली आहे.
दरम्यान, या प्रकरणी आतापर्यंत तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांची कसून चौकशी सुरु आहे. त्यांना ८ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
तरुणी विरोधात आधीच दिलेली होती तक्रार
संबंधित तरुणीविरोधात प्रदीप पूर्णेकरांचा मुलगा राम पूर्णेकर यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता ठाणे गुन्हे शाखेच्या वतीने चौकशी सुरु आहे. यामध्ये आरोपींच्या नातेवाईकांचीही चौकशी सुरु असल्याची माहितीही आहे. परिसरातल्या अनेकां नागरिकांशीही यावेळी पोलिस चर्चा करताना दिसून येत आहेत.
दरम्यान, माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांचीही चौकशी होणार का, यासंबंधी अंदाज व्यक्त केले जात आहेत. पप्या शिंदे, निखिल यादव, आणि नितेश पवार हे संशयित आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत.
सर्वपक्षीय मोर्चाचं नियोजन, मनसेकडून जाहीर
याप्रकरणावरुन आता राजकारणही तापलेलं पाहायला मिळत आहे. ठाण्यामधील कायदा सुवस्था ढासळली आहे, असा दावा करत ठाण्यात गेल्या सहा महिन्यात अनेक हत्या झाल्याचं मनसेचे नेते अविनाश जाधव यांंनी म्हटलं आहे. एवढच नाही तर आता प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येच्या निषेधार्थ ठाण्यामध्ये सर्वपक्षीय मोर्चाचं नियोजनही कररण्यात आलं आहे. यासंबंधीची आज दुपारी दोन वाजता पत्रकार परिषद पार पडली. त्यामध्ये ९ ऑक्टोबर रोजी हा मोर्चा काढणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.