प्रणित मोरेवर पहिली मोठी कारवाई, सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल; आरोप काय?

Pranit More : प्रणित मोरेच्या शोमधील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात येत होती. आता त्यांच्यावर विविध कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे.

प्रणित मोरेवर पहिली मोठी कारवाई, सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल; आरोप काय?
FIR Against Pranit More
Image Credit source: Google
| Updated on: Jun 11, 2026 | 7:22 PM

स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्याच्या शोमधील काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यात एका तरूणाने सांगितलं की, ‘डेट’साठी तो एका तरूणीसोबत गेला आणि त्याने तिथे चिकन बिर्याणीवर 370 रुपये खर्च केले. नंतर त्याला तो खर्च ‘वसूल’ करायचा होता. त्याचे हे बोलणं ऐकून शोमधील काही लोक हसताना दिसले, प्रणित मोरेही यावर हसला. तसेच आणखी एका व्हिडिओमध्ये एका महिला डॉक्टरने एका पेशंटच्या मृत्यूनंतर त्याचा डेड बॉडीबाबत वादग्रस्त विधान केले होते. आता याप्रकरणी प्रणित मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे व इतरांविरोधात महाराष्ट्र सायबरकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह, अश्लील व महिलांबाबत अवमानकारक मजकूर प्रसारित केल्याचा आरोप करत BNS व IT अॅक्टच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रणित मोरे, हिमांशू जांगरा व डॉ. सेजल पवार यांना चौकशीसाठी समन्स देखील बजावण्यात आले आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

काय आहे ‘370 रुपयांच्या बिर्याणीचा ’ वाद?

हा संपूर्ण वाद कॉमेडियन, स्टँड अप कलाकार, प्रणीत मोरेच्या ‘लाइव्ह स्टँड-अप शो’दरम्यान झाला. तो प्रेक्षकांशी संवाद साधत असताना, एका तरुणाने आपल्या ‘डेट’बद्दलचा एक किस्सा सांगितला. या संभाषणादरम्यान त्याने सांगितलं की, ‘डेट’साठी तो एका तरूणीसोबत गेला आणि त्याने तिथे चिकन बिर्याणीवर 370 रुपये खर्च केले. नंतर त्याला तो खर्च ‘वसूल’ करायचा होता. त्याचे हे बोलणं ऐकून शोमधील काही लोक हसताना दिसले, पण सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताच लोकं चांगलेच संतापले. या व्हिडिओवर हजारो कमेंट्सचा ओघ सुरू झाला. हे बोलणं म्हणजे ‘महिलांचा अपमान’ आहे असं म्हणत युजर्सनी या वक्तव्याचा निषेध केला आणि त्या तरुणाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. अशा प्रकारची मानसिकता समाजातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि प्रतिष्ठेसाठी धोकादायक आहे, असं अनेक महिला युजर्सनी लिहीलं.

डॉ. सेजल पवारही अडचणीत

प्रणित मोरेच्या एका शोदरम्यान डॉ. सेजल पवार यांनी वैद्यकीय महाविद्यालयातील कॅडेव्हर (शरीरदान केलेल्या मृतदेह) संदर्भातील आपले अनुभव सांगितले होते. यावेळी तिने केलेल्या एका वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर अनेकांनी या वक्तव्यावर आक्षेप घेत, ते वैद्यकीय व्यवसायाची प्रतिष्ठा आणि वैद्यकीय नैतिकतेच्या विरोधात असल्याची टीका केली होती. आता या तिघांवरही कारवाई करण्यात आली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us