Abhijeet Dipke : अभिजीत दिपकेंच्या आंबेडकरांवरील विधानावरून वाद पेटला; छत्रपती शिवाजी पार्कातील सभेनंतर भाजप नेते तुटून पडले
अभिजीत दिपकेंच्या आंबेडकरांवरील विधानावरून वाद पेटला आहे. दिपकेंच्या विधानावरून भाजप नेत्यांनी जोरदार टीका केली आहे.

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वात मुंबईच्या शिवाजी पार्कात आंदोलन झालं. निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील आंदोलनात मोठ्या संख्येने तरुण विद्यार्थी पोहोचले होते. हजारो तरुणांच्या उपस्थितीत झालेल्या आंदोलनात अभिजीत दिपकेंनी सत्ताधारी नेत्यांवर जोरदार टीका केली. यावेळी दिपकेंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देशाचा पाठीचा कणा, गांधी हे देशाचे आत्मा, तर नेहरू देशाचे मन आहेत, असं विधान दिपकेंनी केलं. या विधानावरून भाजपने दिपकेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अभिजीत दिपकेंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे.
सीजेपीचा फुगा फुटला
अभिजीत दिपकेंनी छत्रपती शिवाजी पार्कातील सभेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन म्हणत दिपकेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर भाजप नेते मंडळी अभिजीत दिपकेंवर तुटून पडले आहेत. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनीही अभिजीत दिपकेंवर निशाणा साधला. ‘देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या नेत्यांचं विडंबन करणे, व्यंगात्मक बोलणे हे महाराष्ट्रातील कोणत्याही नागरिकाला आवडणारं नाही. या आंदोलनमुळे दिपकेंची पत घसरली आहे. खरंतर त्यांची पत नव्हती, तो केवळ फुगा होता, अशी टीका दरेकरांनी केली .
दरेकर पुढे म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान हा दिपकेंनी केला. त्याची निंदा करतो. नेहरूंनी अधिकार दिल्याने बाबासाहेब महान होते, असे दिपकेंनी सांगितले. पण असं बोलणं म्हणजे आंबेडकरप्रेमी जनता आणि भारतीय नागरिकांचा अपमान केल्याचं दिसत आहे. दिपकेंचे वक्तव्य बाबासाहेबांचा अपमान करणारे आहे. आता दिपकेंना जय भीम बोलण्याचाही अधिकार नाही’.
शेलार यांची दिपकेंवर टीका
भाजप नेते आशिष शेलार यांनीही दिपकेंवर टीका केली आहे. ‘लोकांमध्ये फेक नरेटिव्ह पसरवण्याचा सीजेपीकडून प्रयत्न सुरू आहेत. अशा प्रकारचे आंदोलन नेमकं कशासाठी सुरू आहे. हे आंदोलन म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, त्याप्रमाणे अराजकतेचे व्याकरण आहे. 25 नोव्हेंबर 1949 रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी हा शब्द उच्चारला होता’.