A दाबलं की B येतं, सर्व्हर डाऊन, स्क्रीन खराब; हायकोर्ट परीक्षेचा घोळ काय? 5 महत्त्वाचे मुद्दे!
मोठी बातमी समोर येत आहे, आज राज्यभरात मुंबई हायकोर्टातील लिपीक पदाच्या भरतीसाठी टायपिंग परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या परीक्षेदरम्यान मोठा गोंधळ निर्माण झाल्याचं पहायला मिळत आहे.

मोठी बातमी समोर येत आहे, आज राज्यभरात मुंबई हायकोर्टातील लिपीक पदाच्या भरतीसाठी टायपिंग परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या परीक्षेदरम्यान मोठा गोंधळ निर्माण झाल्याचं पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी सर्व्हर ठप्प झाले आहेत. काही ठिकाणी संगणकच बंद आहेत. कीबोर्डमध्ये बिघाड झाला आहे, असा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे, तसेच ही परीक्षा रद्द करून पुन्हा घेण्याची मागणी देखील विद्यार्थ्यांकडून सुरू आहे, आपल्या मागण्यांसाठी राज्यभरातील विद्यार्थी आता आक्रमक झाले आहेत. कल्याण, नांदेड, छत्रपती संभाजीनगर अशा अनेक ठिकाणी आता विद्यार्थ्यांकडून आंदोलनाला सुरुवात झाली आहे. काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घेऊयात.
मुंबई हायकोर्ट लिपीक भरती परीक्षेचा बोजवारा उडाल्याचं पहायला मिळत आहे. कल्याण एपीएमसीतील हायकोर्ट भरती परीक्षा केंद्रावर तब्बल 7 ते 8 तासांपासून विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. ही परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी होत आहे.
सर्व्हर डाऊन, संगणक आणि कीबोर्डमध्ये बिघाड, सकाळच्या सत्रातील अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नसल्याचा आरोप या परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे. दरम्यान आता त्यानंतर पहिल्या सत्रातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा केंद्रातील तब्बल 21 ते 22 त्रुटींच्या लेखी तक्रारी नोंदवून घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तक्रारी हायकोर्टाकडे पाठवून परीक्षा घ्यायची की पुढे ढकलायची, याबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना देण्यात आलं आहे.
दरम्यान दुसरीकडे दुसऱ्या सत्रातील विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी आत बोलावण्यात आलं, मात्र या विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्यास नकार दिला आहे. पहिल्या सत्रासारखीच परिस्थिती आमच्यासोबत होईल असं म्हणत या विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्यास नकरा दिला आहे. परीक्षा पुढे ढकलण्यासोबतच परीक्षा केंद्र बदलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असं या विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान ही परिस्थिती केवळ एकाच परीक्षा केंद्रावर नाहीये तर राज्यातील अनेक परीक्षा केंद्रावर असाच गोंधळ आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील अशीच स्थिती पहायला मिळत आहे. अभिजीत दिपके यांनी परीक्षा केंद्रावर जाऊन या विद्यार्थ्यांची भेट घेतली आहे. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान दुसरीकडे आता पेपर लिक झाल्याचा दावा देखील दिपके यांच्याकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आता हा गोंधळ आणखी वाढण्याची शक्यता आहे.