भाजप नेत्या पंकजा मुंडे अडचणीत, पुन्हा कारखान्याला नोटीस, आता असे आहे प्रकरण

BJP Pankaja Munde | काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचा 19 कोटी रुपयांचा साखरेवरील जीएसटी न भरल्या प्रकरणी नोटीस दिली होती. त्यावेळी पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन गावागावातून पैसा गोळा केले होते. आता पुन्हा नोटीस आली आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडे अडचणीत, पुन्हा कारखान्याला नोटीस, आता असे आहे प्रकरण
Pankaja Munde
| Updated on: Feb 17, 2024 | 12:07 PM

संभाजी मुंडे, बीड, दि. 17 फेब्रुवारी 2024 | भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्यासमोरील संकट संपण्याची चिन्ह दिसत नाही. काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचा 19 कोटी रुपयांचा साखरेवरील जीएसटी न भरल्या प्रकरणी नोटीस दिली होती. त्यावेळी पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन गावागावातून पैसा गोळा केले होते. काही कार्यकर्त्यांनी धनादेशही पाठवले आहेत. कार्यकर्त्यांच्या या प्रेमामुळे पंकजा मुंडे भारावून गेल्या होत्या. त्यांनी एक व्हिडीओ ट्विट करून सर्वच कार्यकर्त्यांचे आभार मानले होते. तसेच आता मला आर्थिक मदत नका. तुमचे प्रेम राहू द्या, असे आवाहन केले होते. या प्रकरणास काही महिने होत नाही तोपर्यंत पुन्हा पंकजा मुंडे यांच्यासमोर अडचण झाली आहे. त्यांना पुन्हा नोटीस आली आहे.

आता कशामुळे नोटीस

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) ६१ लाख ४७ हजार रुपये थकवले आहे. ही रक्कम न भरल्यामुळे शुक्रवारी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने त्यांच्या कारखान्याला नोटीस बजावली आहे. मागच्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या कारणाने वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना बंद आहे. त्यामुळे या साखर कारखान्याने कर्मचाऱ्यांच्या पीएफची रक्कम संबंधित कार्यालयाकडे भरली नाही. त्यामुळे ही नोटीस देण्यात आली आहे.

कारखाना का आहे बंद

पंकजा मुंडे वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन आहे. या कर्मचाऱ्यांच्या पीएफची रक्कम संबंधित कार्यालयाकडे भरली गेली नाही. यामुळे आता पीएफ कार्यालयाने सुद्धा या कारखान्याच्या व्यवस्थापनाला नोटीस बजावली आहे. पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना हा मागील अनेक महिन्यांपासून पाण्याची कमतरता दुष्काळी या सोबतच वेगवेगळ्या कारणामुळे बंद आहे. त्यामुळे बंद असलेल्या सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या पीएफची रक्कम भविष्य निधी कार्यालयाकडे भरली गेली नाही.

त्यावेळी पंकजा मुंडेंकडून भावनिक आवाहन

जीएसटीची नोटीस आल्यानंतर कार्यकर्त्यांनी पैसे जमा केल्यानंतर पंकजा मुंडे भारावून गेल्या होत्या. त्यांनी म्हटले होते की, तुमचे प्रेम माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील अकाऊंटमध्ये जमा करा. तेच आवश्यक आहे. तुमच्याकडून रक्कम घेणं मला पटत नाही. माझा स्वाभिमान मला ते करू देत नाही. त्यामुळे त्या रकमा घरी ठेवा आणि प्रेम माझ्या अकाऊंटमध्ये जमा करा.