
मावळ आणि पिंपरी-चिंचवड परिसरात जमिनीचे भाव गगनाला भिडलेले असताना, भूमाफियांच्या टोळ्या गुंडांच्या मदतीने भूखंड बळकावत असल्याचे धक्कादायक वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. ताथवडे येथील ३६ हेक्टर जमिनीच्या वादग्रस्त प्रकरणात एका सॉफ्टवेअर कंपनीच्या मालकाची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी कुख्यात रामा ग्रुपचे मोती पंजाबी यांच्यासह एकूण १९ जणांवर लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याची दखल स्वतः पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतली आहे. या प्रकरणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या प्रकरणाची मूळं १७६९ सालापर्यंत जातात, जेव्हा पेशवे सरकारने नारायण विश्वनाथ भट (थत्ते) यांना ताथवडे येथील ३६ हेक्टर ४२ आर जमीन इनाम म्हणून दिली होती. पुढे १९५३ मध्ये इनाम अबोलिशन कायद्याने ही जमीन शासनाकडे गेली, मात्र कायदेशीर लढ्यानंतर पुन्हा थत्ते कुटुंबाच्या नावावर तिचा हक्क प्रस्थापित झाला. यानंतर, राजीव अरोरा यांनी त्यातील ३४ हेक्टर ३५ आर जमीन कायदेशीररित्या विकत घेतली. अरोरा कुटुंबाने आपल्या जमिनीवर सुरक्षेसाठी कंपाऊंड उभारले होते. परंतु, याच जमिनीवर ‘लिटीगेशन’ असल्याचे दाखवून बनावट दावे तयार करण्यात आले.
याच बनावट कागदपत्रांचा फायदा घेत, रामा ग्रुपच्या पंजाबी भावंडांनी गुंडांच्या टोळ्यांना हाताशी धरून जमिनीवर ताबा मिळवण्याचा कट रचला. फिर्यादी राहुल अरोरा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मोती पंजाबी, राजू पंजाबी, जितेंद्र पंजाबी, नरेश पंजाबी यांच्यासह एकूण १९ जणांनी बनावट दस्तऐवज आणि खोटे व्यवहार करून जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला. यात मूळ थत्ते कुटुंबातील किरण थत्ते, उदय थत्ते, महेश गाडगीळ आणि प्रकाश छाजेड यांच्यासह अभिजित काटे आणि संदिप पवार यांचाही सहभाग असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या सर्वांनी बनावट हिस्सा दाखवून एलिफंटा रिअल्टी (रामा ग्रुप) सोबत जमीन विक्रीचा खोटा करार केल्याचा आरोप आहे.
या भूखंड बळकावण्याच्या डावाला अधिकृत रूप देण्यासाठी अनेक प्रभावशाली व्यक्तींच्या नावांचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे. अखेर, सॉफ्टवेअर कंपनीचे मालक राहुल अरोरा यांनी पुणे पोलिसांकडे धाव घेतली. या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी थेट यात लक्ष घातले आणि त्यांच्या मान्यतेनंतरच आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) या प्रकरणाचा तपास सुरू केला.
या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर रामा ग्रुपचे जितेंद्र पंजाबी यांनी आपली बाजू मांडली आहे. “ज्यांनी आमच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे, त्यांना जमिनीच्या 7/12 उताऱ्याबद्दल माहिती नाही. हा 7/12 माझ्या नावावर असून, गुन्हाच दाखल होऊ शकत नाही. आम्ही आमची बाजू न्यायालयात मांडू.” असे जितेंद्र पंजाबी म्हणाले. या घटनेमुळे भूमाफिया आणि बिल्डर लॉबी थेट गुंडांच्या मदतीने जमिनी बळकावत असल्याचा प्रकार पुन्हा एकदा उघड झाला आहे. पुणे पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, आरोपींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.