पुणे पदवीधर निवडणुकीत वारं फिरलं, शिंदे सेनेचा पाठिंबा अपक्ष उमेदवाराला? उदय सामंत यांच्या भाऊसाहेब आंधळकरांच्या भेटीने मोठा ट्वीस्ट
Pune Graduates Constituency Election : पुण्यात महायुतीत सर्व काही अलबेल नसल्याचे उघड झाले आहे. शिंदे सेनेने इथं डाव टाकलाच. शिक्षक मतदारसंघानंतर आता पुणे पदवधीर मतदारसंघातही शिंदे सेना भाजपला हाबाडा देण्याच्या तयारीत तर नाही ना?

Uday Samant meeting with Bhausaheb Andhalkar : पुणे विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीनंतर आता पदवधीर मतदारसंघातही वारं फिरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिक्षक मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढतीवर महायुतीचं गाडं येऊन ठेपलं. पुण्यात शिंदे सेनेने भाजपविरोधात शड्डू ठोकले. शिक्षक मतदारसंघात मंगेश चिवटे यांनी अर्ज मागे घेतला खरा, पण सचिन सानप यांना पाठिंबा देऊन शिंदे सेनेने वाचपा काढण्याची संधी सोडली नाही. आता पदवीधर मतदारसंघातही मोठा ट्वीस्ट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एका भेटीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. काय आहे याविषयीची मोठी अपडेट?
भाऊसाहेबांच्या दाव्याने भाजपच्या गोटात अस्वस्थता
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचा मला पाठिंबा आहे, असा दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि अपक्ष उमेदवार भाऊसाहेब आंधळकर यांनी केला आहे. मंत्री उदय सामंत यांनी नुकतीच भाऊसाहेब आंधळकर यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. त्यानंतर आपल्याला शिवसेना शिंदे गटाचा पाठिंबा असल्याचा दावा अपक्ष उमेदवार भाऊसाहेब आंधळकर यांनी केला आहे. आंधळकर यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता आहे. भाऊसाहेब आंधळकर हे पदवीधर मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. शिक्षक मतदारसंघात जी खेळी खेळली तीच पदवीधरमध्ये पण शिंदे शिवसेना खेळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुणे पदवीधर मतदारस संघातून स्मिता जाधव तर शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे हे महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्याचे सांगितले जाते. तर हर्षदा देशमुख-जाधव या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून पदवीधरच्या उमेदवार आहेत. शिक्षक मतदारसंघात प्रा. जयंत आसगावकर हे मविआचे उमेदवार आहेत. या दोन्ही मतदारसंघात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा धडाडत असतानाच महायुतीमधील अंडरकरंट समोर येत आहे.
महाविकास आघाडीने एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून पुण्यातील वातावरण ढवळून काढले आहेत. तर पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीविरोधात भाजप असे समीकरण तयार झाले आहेत. त्यात शिंदे सेनेच्या भूमिकेने भाजपच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहेत. उमेदवार भाजपचे पण महायुतीमधील घटक पक्षांनी वेगळाच सूर आळवल्याने पक्षासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. मंत्री उदय सामंत यांच्या भेटीमुळे शिंदे सेनेने अंधाळकरांना पाठिंबा दिल्याचे मानले जात आहे. अजून याबाबत अधिकृत भूमिका समोर आली नसली तरी ताज्या घडामोडींमुळे भाजपचे टेन्शन वाढले आहे.