चिंचवडमध्ये ‘काटे’ की टक्कर, पण भाजपच्या अश्विनी जगताप आघाडीवर; तिसऱ्या फेरीत किती मते?

| Updated on: Mar 02, 2023 | 9:28 AM

पोस्टल मतदानात आघाडीवर आहे. ही साहेबाच्या केलेल्या कामाची पावती आहे. आम्ही ही निवडणूक विकासाच्या मुद्यावर लढविली. मेट्रो सिटी आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमातून विकास करणार आहोत.

चिंचवडमध्ये काटे की टक्कर, पण भाजपच्या अश्विनी जगताप आघाडीवर; तिसऱ्या फेरीत किती मते?
ashwini jagtap
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पुणे : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. या मतमोजणीची पहिली आणि दुसरी फेरी संपली आहे. तिसऱ्या फेरीसाठी मतमोजणी सुरू आहे. पहिल्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप या आघाडीवर आहेत. दुसऱ्या फेरीतही अश्विनी जगताप यांनी ही आघाडी कायम राखली आहे. तर तिसऱ्या फेरीत अश्विनी जगताप यांनी 903 मतांची आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादीचे नाना काटे हे तिसऱ्या फेरीतही पिछाडीवर गेले आहेत. मात्र, जगताप यांनी घेतलेली आघाडी अत्यंत किरकोळ असून इतर फेऱ्यांमध्ये चित्र पालटण्याची शक्यता आहे. त्यामुळे चिंचवडमध्ये सध्या तरी काटे आणि अश्विनी जगताप यांच्या काँटे की टक्कर सुरू असल्याचं चित्रं आहे.

आज सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीलाच पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. या मोजणीत अश्विनी जगताप या आघाडीवर होत्या. पोस्टल मतमोजणीत अश्विनी जगताप यांना पोस्टल मतमोजणीत 300 मते मिळाली. तर पहिल्या फेरीत नाना काटे 3604, अश्विनी जगताप यांना 4053 मते आणि राहुल कलाटे 1273 मते मिळाली. पहिल्या फेरीतही अश्विनी जगताप आघाडीवर होत्या. त्यानंतर दुसऱ्या फेरीतही त्यांनी आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत जगताप यांना 4 हजार 471 मते मिळाली. राष्ट्रवादीच्या नाना कलाटे यांना 3 हजार 701 मते तर अपक्ष राहुल कलाटे यांना 1 हजार 674 मते मिळाली. या फेरीत जगताप या 700 मतांनी आघाडीवर होत्या.

कलाटेंमुळे फटका?

तिसऱ्या फेरीतही अश्विनी जगताप आघाडीवर होत्या. तर नाना काटे पिछाडीवर होते. तिसऱ्या फेरीत अश्विनी जगताप या 903 मते घेऊन आघाडीवर आहेत. तिसऱ्या फेरीत जगताप यांना 7 हजार 882 मते मिळाली. नाना काटे यांना 7 हजार 206 मते मिळाली आहेत. तर तिसऱ्या स्थानी असलेल्या राहुल काटे यांना 2 हजार 645 मते मिळाली आहेत. काटे अवघ्या 903 मतांनी पिछाडीवर असल्याने राष्ट्रवादीची धाकधूक वाढली आहे. या ठिकाणी अपक्ष उमेदवार राहुल कलाटे हे राष्ट्रवादीची मते खाताना दिसत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला मोठा फटका बसताना दिसत आहे.

जगताप काय म्हणाल्या?

पोस्टल मतदानात आघाडीवर आहे. ही साहेबाच्या केलेल्या कामाची पावती आहे. आम्ही ही निवडणूक विकासाच्या मुद्यावर लढविली. मेट्रो सिटी आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमातून विकास करणार आहोत. माझा विजय हा निश्चित आहे, असं अश्विनी जगताप म्हणाल्या. तर, नाना काटे यांनाही आपलाच विजय होईल असा विश्वास वाटत आहे. दरम्यान, मतमोजणी केंद्राबाहेर प्रचंड गर्दी जमली आहे. कोण विजयी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. प्रत्येक फेरीत कांटे की टक्कर होत असल्याने कार्यकर्त्यांमध्येही चुळबुळ सुरू झाली आहे.