
बारामती : ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी एक दाम्पत्य ८० हजार रुपये खर्चून दुबईहून बारामती तालुक्यातील गडदरवाडीला आले आहे. गडदरवाडीतील सचिन गोकुळ लकडे हे दुबई देशातील शा विमानतळावर कामाला आहेत. ते मूळचे बारामती तालुक्यातील गडदरवाडी गावातील आहेत. सन २०२२ ची ग्रामपंचायत निवडणूक लागली आहे. या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ते आपली पत्नी सरिता यांच्यासह थेट दुबईहून गडदरवाडीला दाखल झाले आहेत. त्यासाठी त्या दाम्पत्याला दोन्ही बाजूकडील विमान प्रवासासाठी तब्बल ८० हजार रुपयांचा खर्च आला आहे.
मात्र असे असले तरी गाव कारभाराची धुरा योग्य व्यक्तीकडे जावी यासाठी मतदान करण्यासाठी आलो आहे. मतदान करून वेगळे समाधान भेटल्याची भावना सचिन लकडे यांनी व्यक्त केली..
राज्यभरातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार आज सरासरी सुमारे 74 टक्के मतदान झाले. यावेळी सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठीदेखील मतदान पार पडले.
राज्य निवडणूक आयोगाने 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यातील काही ठिकाणी सरपंचपदाच्या, तर काही ठिकाणी सदस्यपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या.
त्यामुळे आज प्रत्यक्षात 7 हजार 135 ग्रामपंचायतींसाठी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान झाले. दुपारी 3.30 पर्यंत प्राथमिक माहितीनुसार सरासरी 67 टक्के मतदान झाले होते. नक्षलग्रस्तभागात दुपारी 3.30 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ होती. सर्व ठिकाणी 20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी होईल.
प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: ठाणे – 35, पालघर – 62, रायगड – 191, रत्नागिरी – 163, सिंधुदुर्ग – 291, नाशिक – 188, धुळे – 118, जळगाव – 122, अहमदनगर – 195, नंदुरबार – 117, पुणे – 176, सोलापूर – 169, सातारा – 259, सांगली – 416, कोल्हापूर – 429, औरंगाबाद – 208, बीड – 671, नांदेड – 160, उस्मानाबाद- 165, परभणी – 119, जालना – 254, लातूर – 338, हिंगोली – 61, अमरावती – 252, अकोला – 265, यवतमाळ – 93, बुलडाणा – 261, वाशीम – 280, नागपूर – 234, वर्धा – 111, चंद्रपूर – 58, भंडारा – 304, गोंदिया – 345, गडचिरोली- 25. एकूण – 7,135.