Pune News | डोंगराचा रस्ता…चढण्यासाठी पायवाट अवघड…शेतीसाठी यांनी नेले ट्रॅक्टर

pune news farmers tractor | 4 हजार 694 फूट उंचीवर असलेल्या या पठारावर ट्रॅक्टर नेण्याची किमया शेतकऱ्यांनी करुन दाखवली आहे. आतापर्यंत या ठिकाणी पारंपारिक शेती होत होती. त्याला आता यांत्रिकरणाची जोड मिळाली आहे.

Pune News | डोंगराचा रस्ता...चढण्यासाठी पायवाट अवघड...शेतीसाठी यांनी नेले ट्रॅक्टर
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 21, 2023 | 1:46 PM

विनय जगताप, भोर, पुणे | 21 ऑक्टोंबर 2023 : पुण्याच्या भोर तालुक्यातील रायरेश्वर किल्ला परिसरात विस्तीर्ण पठार आहे. या पठारावर काही जण शेती करतात. 4 हजार 694 फूट उंचीवर असलेल्या या पठारावर शेतीची साधी आवजारे नेणेही अवघड आहे. परंतु अशोक जंगम आणि रवींद्र जंगम या दोन शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती सोडून आधुनिक शेतीची कास धरण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी ट्रॅक्टर विकत घेतले. परंतु ज्या डोंगरावर चालण्यास साधी पायवाट नाही, त्या 4 हजार 694 फूट उंचीवर ट्रॅक्टर कसे न्यावे, हा प्रश्न त्यांना पडला. मग त्यांनी जुगाड केला अन् ट्रॅक्टर 4 हजार 694 फूट उंचीवर नेले.

45 जंगम कुटुंबांची शेती

रायरेश्वर किल्ला परिसरात विस्तीर्ण पठारावर 45 जंगम कुटुंबांची शेती आहे. या जंगम कुटुंबांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. शेतीवर या कुटुंबांचा उदरनिर्वाह आहे. यामुळे सर्वांना शेतीसाठी सोय व्हावी म्हणून किल्ल्यावर राहणारे अशोक जंगम आणि रवींद्र जंगम या दोघा शेतकरी भावांनी ट्रॅक्टर खरेदी केले. परंतु हे ट्रॅक्टर न्यावे कसे? हा प्रश्न त्यांना पडला. मग त्यांनी 20 ते 25 ग्रामस्थांशी चर्चा केली. सर्वांनी मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर पुढे ट्रॅक्टर नेण्याची मोहीम सुरु झाली.

कशी सुरु झाली मोहीम

ट्रॅक्टरचे टायर, इंजिन, मडगार्ड तसेच काही अवजड पार्ट वेगळे केले. एक, एक करून हे सगळे पार्ट किल्ल्यावर नेण्याचे ठरले. मग अवघड लोखंडी जिना आणि कड्याकपऱ्या पार करत 20 ते 25 ग्रामस्थांच्या मदतीने खांद्यावर उचलून ट्रॅक्टर नेण्यात आले. 4 हजार 694 फूट उंचीवरील पठारावर ट्रॅक्टर नेण्यासाठी दोन दिवस लागले. किल्ल्यावर सर्व पार्ट पोहचल्यावर पुन्हा ते जोडण्यात आले. त्यानंतर ट्रॅक्टर सुरु झाले. इतिहासात पहिल्यांदाच 4 हजार 694 फूट उंची असणाऱ्या रायरेश्वर किल्ल्यावर ट्रॅक्टर आला.

शेतकऱ्यांनी ठरवले अन् करुन दाखवले

भोर तालुक्यातील किल्ले रायरेश्वर पठारावर जाण्यासाठी साधी पायवाट नाही. या ठिकाणी असलेल्या दगडी पायऱ्या आणि लोखंडी शिडीचा वापर करताना पर्यटकांची दमछाक होते. कारण ही शिडी तीव्र उताराची आहे. शिडीवरुन गडावर‌ जाताना आणि खाली उतरताना भिती वाटते. या परिस्थितीत रायरेश्वर येथील शेतकरी बंधूनी ट्रॅक्टर नेण्याची किमया केली. या शेतकऱ्यांनी जिद्दी आणि इच्छा शक्तीमुळे अशक्य गोष्ट शक्य करुन दाखवले. 18 आणि 19 ऑक्टोबर असे दोन दिवस या मोहिमेसाठी लागले.

पठारावर 300 लोकसंख्या 45 कुटुंबे

किल्ले रायरेश्वरील 16 किलोमीटर पसरलेल्या पठारावराची लोकसंख्या 300 आहे. या ठिकाणी 45 कुटुंबे राहतात. हे ठिकाण भोरपासून 26 किलोमीटर आहे. बस कोर्ले गावापर्यंत येते. त्यानंतर रायरेश्वराकडे जाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागते. शेतकरी या पठारावर सेंद्रिय गव्हाची शेती बरोबरच नाचणी, वरईची शेती करतात. आतापर्यंत शेतीची मशागत पारंपारीक मानव आणि बैलांच्या सहाय्याने केली जाते. परंतु आता ट्रॅक्टरची जोड मिळाली आहे.