Gautami Patil: ती आली… तिने पाहिलं… पण नाचली नाही, तुफान गर्दी असूनही गौतमी पाटील आली तशी गेली, दहीहंडीत असं काय घडलं?
Gautami Patil: दहीहंडी उत्सवात आक्षेपार्ह डान्स करणाऱ्यांवर पोलिसांनी करडी नजर ठेवली असल्याचा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला होता. त्यामुळे गौतमी पाटीलने कार्यक्रमात हजेरी लावली पण नृत्य काही सादर केले नाही.

आज संपूर्ण देशात दहीहंडी हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. ठिकठिकाणी गोविंदा पथके थर लावून सलामी देताना दिसत आहेत. काही ठिकाणी कलाकारा गाण्यांवर ठेका धरताना दिसले. दरम्यान, पुण्यात दहीहंडीनिमित्ताने गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला लाखो तरुणांनी गर्दी केली. पण गौतमी पाटीलने या कार्यक्रमात नृत्य सादर न करता खंत व्यक्त केली.
आज मी काही…
वारजे-कर्वेनगर भागात आयोजित करण्यात आलेल्या या दहीहंडी कार्यक्रमात उपस्थितांनी उत्साहाने सहभाग घेतला. मात्र, यंदा राज्य सरकारने डीजे लावणीवर नृत्यावर बंदी आणल्याने गौतमी पाटीलला पूर्वीसारखे नाचता आले नाही. याबाबत तिने खंत व्यक्त केली. कार्यक्रमात उपस्थितांशी बोलताना गौतमी पाटील म्हणाली की, “आज मी काही जास्त करू शकत नाही याची मला खंत आहे. तुम्हाला बघितलं की मला तरतरी येते.” उपस्थितांच्या उत्साहाचे कौतुक करत गौतमीने भावना व्यक्त केल्या आहेत.
यंदा राज्य सरकारने डीजे लावणीवर नृत्यावर बंदी घातल्याने अनेक कलाकारांना आपली पारंपरिक सादरीकरणे मर्यादित स्वरूपात करावी लागत आहेत. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमातही ही बंदी लागू होती. तरीही चाहत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमात उत्साह भरला.
पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त काय म्हणाले होते?
पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दोन दिवसांपूर्वी दहीहंडीच्या कार्यक्रमांमध्ये सेलिब्रिटी तसेच इतर कलाकारांना आमंत्रित केले जाते. मात्र, काही ठिकाणी कार्यक्रमादरम्यान स्टेजवर अश्लील अथवा आक्षेपार्ह नृत्याचे प्रकार घडताना दिसतात. अशा प्रकारांमुळे कार्यक्रमस्थळी मोठी गर्दी होऊन गोंधळाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे दहीहंडी उत्सवादरम्यान अश्लील डान्स किंवा आक्षेपार्ह प्रकार घडल्यास संबंधित मंडळांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा दिला होता. त्यामुळे गौतमी पाटीलने कार्यक्रमात नृत्य सादर न करता केवळ हजेरी लावून परत जाण्याचा निर्णय घेतला.