ढापे चोरीला गेलेत, अजित पवार म्हणाले, मला गुपचूप नाव सांगा !

| Updated on: Oct 10, 2021 | 9:12 PM

बारामती तालुक्यातील बाबुर्डी येथील बंधाऱ्याचे ढापे चोरीला गेल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. विशेष म्हणजे चोरयट्यांनी एक-दोन नव्हे तर तब्बल 192 ढापे चोरुन नेले आहेत.

ढापे चोरीला गेलेत, अजित पवार म्हणाले, मला गुपचूप नाव सांगा !
उपमुख्यमंत्री अजित पवार
Follow us on

पुणे (सोमेश्वरनगर) : बारामती तालुक्यातील बाबुर्डी येथील बंधाऱ्याचे ढापे चोरीला गेल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी एक-दोन नव्हे तर तब्बल 192 ढापे चोरुन नेले आहेत. ढापे हे बंधारे किंवा धरणभागात पाणी अडवण्यासाठी खूप उपयोगी पडतं. पण हिच ढापे आता चोरीला गेल्याची घटना बाबुर्डीत समोर आली आहे. या प्रकरणाची दखल खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे. पुणे जिल्ह्यातील सोमेश्वरनगर येथील प्रचारसभेत भाषण करत असताना त्यांनी या प्रकरणावर भाष्य केलं. तसेच ज्यांनी ढापे चोरी केली त्यांची गुपचूप मला माहिती द्या. मी पोलिसांना सांगेन, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

ढापे चोरीला गेले, यावरही आम्हीच लक्ष ठेवायचं का?

“परिसरातील धरणांमध्ये चांगला पाणीसाठा झालाय. अनेक धरणं भरली आहेत. पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दुसरीकडे बाबुर्डीत बंधाऱ्याचे ढापे चोरीला गेले आहेत. आता यावरही आम्हीच लक्ष ठेवायचं का? तुमची काहितरी जबाबदारी नाही का? 192 ढापे चोरीला जातात. त्याच्यामागे कोणतरी असेल. मला गुपचुप नाव सांगा. मी पोलिसांना सांगून कारवाई करायला सांगतो”, असं अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वर्चस्व असलेल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यात सध्या निवडणुकीचं वातवरण आहे. येत्या 12 ऑक्टोबरला मतदान असणार आहे. तर 14 ऑक्टोबरला मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीसाठीच्या प्रचाराचा वेळ आज समाप्त होतोय. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज सोमेश्वरनगरमध्ये आले होते. यावेळी कारखाना परिसरातच त्यांची सभा झाली. या सभेत त्यांनी राज्यासह देशभरात घडणाऱ्या विविध घटनांवर भाष्य केलं. काही घटनांवर त्यांनी मिश्किल शब्दांत प्रतिक्रिया दिली. तर काही घटनांवर आपलं मत मांडताना पोटतिडकीने काही विषय मांडले.

‘उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज होवू नका’

“उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज होवू नका. गावातलं राजकारण या निवडणुकीत आणू नका. काहींनी चुकीचे फलक लावले. त्यावर बातम्या झाल्या. बारामती म्हटलं की बातमी मोठी होते. जर माझे नेतृत्व कोणाला मान्य नसेल तर माझ्या पक्षात राहू नका. माझ्यापेक्षा कोणी कर्तृत्ववान असेल तर तिकडे जा. माझी नाहक निंदा नालस्ती का करता? कोणी काय केलं? कुणाच्या बैठका झाल्या? हे सगळं माहितीये. तुम्हाला पॅनलमध्ये घेतलं तर अजित पवार चांगला आणि पॅनलमध्ये नाही घेतलं तर वाईट हे असलं खपवून घेणार नाही. लोकं जेवायला बोलवतात, जेवायला घालतात आणि निघून गेलं की चुकीचं वागतात”, असं अजित पवार म्हणाले.

‘कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर सभा’

“मला खरंच खूप व्याप आहेत. पण केवळ कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आज सभा घेतली. सोमेश्वरला मदत नाही झाली तर इतर ठिकाणी संधी देवू, असा शब्द दिला होता. पण तरीही काहींनी चुकीचं काम केलं. सोमेश्वरच्या निवडणुकीत पॅनल टू पॅनल मतदान करा. उगाच क्रॉस वोटींग करु नका. अजिबात गहाळ राहू नका. समोरचं पॅनल मजबूत आहे असं समजूनच काम करा. तुमच्या ऊसाला चांगला दर मिळवायचा असेल तर आम्हाला साथ द्या”, असं आवाहन अजित पवारांनी केलं.

‘शेतकऱ्यांच्या कष्टाचा मोबदला मिळावा’

“152 गावांचं कार्यक्षेत्र. सोमेश्वर कारखान्यात ज्यावेळी भरती असेल त्यावेळी मतदारसंख्या जास्त असेल तिथल्या मुलांना संधी दिली जाईल. तुमच्यामुळे मला अनेक ठिकाणी कामाची संधी मिळाली. कुठलातरी राग कुठेही काढण्याचा प्रयत्न करु नका. राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांची दयनीय अवस्था आहे. काहींनी उमेदवारी मिळाली नाही म्हणून काहीही चालवलंय. पण तुम्हाला आम्ही वेळोवेळी संधी दिलीय हे विसरु नका. शेतकऱ्यांच्या कष्टाचा मोबदला मिळावा. त्यांना योग्य सन्मान मिळावा ही आमची भावना. यशवंतराव चव्हाण यांच्या शिकवणुकीतून पुढे जाण्याचा आमचा प्रयत्न. काहीजण याला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात”, असंदेखील पवार यावेळी म्हणाले.

अजित पवारांचा नारायण राणेंवरही प्रहार

अजित पवार यांनी यावेळी सभेत बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणेंवरही प्रहार केला. काल सिंधुदुर्गमध्ये विमानतळ उद्घाटन झालं. मी सगळं विकासकामांबद्दल बोललो. विमानतळ झालं हे काही एकट्यादुकट्याचं काम नाही. 25 वर्षे पाठपुरावा केला आणि आता हे नेते उठले. भाषण हाणलं. मग मुख्यमंत्री तरी गप्प कशाला बसतील, असं म्हणत अजित पवारांनी नारायण राणेंवर प्रहार केलाय. तेही काळा तिटा लावायचाय म्हणाले. जशाला तसं उत्तर दिलं. पवारसाहेबांची आम्हाला शिकवण आहे. अनेकजण विरोधकांना सल्ला द्यायचे की पवारसाहेबांवर बोलू नका ही संस्कृती असल्याचंही अजित पवारांनी अधोरेखित केलंय.

हेही वाचा :

मग मुख्यमंत्री तरी कशाला गप्प बसतील, राणेंची टीका, अजित पवारांची बारामतीच्या सभेत टिप्पणी