मोशी कचरा डेपो दुर्घटना : घरी आवडती बिर्याणी तरीही मित्रासोबत जेवायला थांबले, एका क्षणाच्या निर्णयाने उद्ध्वस्त झाले कुटुंब

बुधवारी ८ जुलैला दुपारी दीडच्या सुमारास मोशी येथील कचऱ्याचा डोंगर तीन मजली प्रशासकीय इमारतीवर कोसळला. या दुर्घटनेमध्ये ८ जणांचा मृत्यू झाला आहे.

मोशी कचरा डेपो दुर्घटना : घरी आवडती बिर्याणी तरीही मित्रासोबत जेवायला थांबले, एका क्षणाच्या निर्णयाने उद्ध्वस्त झाले कुटुंब
Moshi
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jul 12, 2026 | 8:45 AM

मोशी येथील कचऱ्याचा प्रचंड डोंगर तीन मजली प्रशासकीय इमारतीवर कोसळला. बुधवार, ८ जुलै रोजी दुपारी सुमारे दीड वाजता घडलेल्या या भीषण दुर्घनेत आतापर्यंत आठ कामगारांचा मृत्यू झाला आहे. त्यात एक होते ३६ वर्षीय सनी अशोक माने. सनी हे सर्व आवरुन घरी निघाले होते. बायकोने घरी त्यांच्या आवडीची बिर्याणी बनवली होती. मात्र, मित्राने आग्रह केला म्हणून ते तेथेच थांबले आणि धिगाऱ्यात अडकले गेले.

नेमकं काय घडलं?

त्या दिवशी घरी आनंदाचे वातावरण होते. सनी यांच्या आवडीची बिर्याणी पत्नी कांचन यांनी विशेष प्रेमाने तयार केली होती. काम संपवून सनी घरी जेवायला निघाले होते. पण त्यांच्या एका मित्राने “आज थांब, सोबत जेवूया” असा आग्रह धरला. मित्राचे मन राखण्यासाठी सनी कॅन्टीनमध्ये थांबले. तो क्षणभर थांबला, खरं; पण त्याच क्षणी नियतीने क्रूर खेळ खेळला. ते जेवायला बसणार इतक्यात कचऱ्याचा महाकाय ढिगारा कोसळला आणि सनी त्यात कायमचे गाडले गेले.

पत्नीच्या डोळ्यात पाणी

“जर ते मित्राचं ऐकून थांबले नसते आणि थेट घरी आले असते, तर आज आमचा सुखी संसार उघड्यावर पडला नसता,” असा आक्रोश करत कांचन ढसाढसा रडत होत्या. त्यांचा हा दु:खी आक्रोश ऐकून उपस्थित सर्वांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

मूळचे दिघी येथील रहिवासी असलेले सनी माने मोशी कचरा डेपो परिसरात वाहनचालक म्हणून काम करत होते. कष्टाळू स्वभावाचे आणि कुटुंबावर असीम प्रेम करणारे सनी संपूर्ण घराची जबाबदारी एकट्याने सांभाळत होते. त्यांच्या मागे पत्नी कांचन, दोन लहान मुले आणि वृद्ध आई-वडील असा मोठा परिवार आहे. या दुर्घनेने दोन निरागस चिमुकल्यांच्या डोक्यावरील पित्याचे छत्र कायमचे हिरावून घेतले आहे. ज्यांनी डोळ्यादेखत मुलाला मोठे केले, त्या वृद्ध आई-वडिलांच्या म्हातारपणाची काठीच नियतीने हिसकावून घेतली आहे. मित्राचा एक जिव्हाळ्याचा क्षणभराचा आग्रह सनी यांच्यासाठी जीवघेणा ठरला. एक छोटासा निर्णय, एक क्षणभराची थांब… आणि एका सुखी कुटुंबाचे आयुष्य कायमचे बदलून जाते, याचे हे दुःखद उदाहरण पाहून संपूर्ण पिंपरी-चिंचवड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Follow Us