
पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे पुन्हा मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. राजकीच नेते मंडळी त्याच्या घरी जाऊन गाठीभेटी घेत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ यांनीही मागे मारणेची भेट घेतली होती. त्यानंतर शरद पवार गटाचे नेते आणि नवनिर्वाचित खासदारा निलेश लंके यांनीही भेट घेतलेली. आता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी गजानन मारणेसोबत व्हिडीओ टाकत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. या व्हिडीओची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
पार्थ पवार यांनी गजानन मारणेची भेट घेतल्यावर अजित पवार यांनी आपण त्याला विचारणा करणार असल्याचं म्हटलं होतं. इतकंच नाहीतर पुन्हा असे अजिबात घडता कामा नये, असं म्हणत अजित पवारांनी मुलाला फटकारलं होतं. मात्र आता त्यांच्याच महिला नेत्या रूपाली ठोंबरे-पाटील यांनी गजानन मारणेसोबतचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये रूपाली ठोंबरे गजा मारणेचा सत्कार करत आहेत.
‘गजानन मामा आपणास जन्म दिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा’, असं कॅप्शन देत रूपाली ठोंबरे पाटील यांनी गुंड गजा मारणेला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. एकीकडे अजित पवारांनी आपल्या मुलाल फटकारलं मात्र रूपाली ठोंबरे पाटलांनी जाहीरपणे कुख्यात गुंडाला शुभेच्छा दिल्या आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
दरम्यान, पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी गुन्हेगारांची ओळख परेड घेत प्रत्येकाला दम भरला होता. मात्र त्यानंतरही इन्स्टाग्रामवर M Company pune king या नावाने गजा मारणे याचं फॅन पेज आहे. ज्यावर गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणारे अनेक व्हिडीओ स्टोरीला ठेवले जातात. त्यासोबतच काही तशा प्रकारचे व्हिडीओही पोस्ट केलेले आहेत.