चर्चा तर होणार… पुण्यात चंद्रकांत पाटील यांनी घेतली ठाकरे गटाच्या माजी आमदाराची भेट

| Updated on: May 20, 2023 | 12:30 PM

Pune BJP : पुणे शहरात भारतीय जनता पक्षात मोठे बदल करण्याचा हालचाली सुरु आहे. त्याचवेळी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे गटाच्या माजी आमदाराची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत. ठाकरे गटाला पुण्यात धक्का बसणार का? हे लवकरच दिसून येईल.

चर्चा तर होणार... पुण्यात चंद्रकांत पाटील यांनी घेतली ठाकरे गटाच्या माजी आमदाराची भेट
Follow us on

योगेश बोरसे, पुणे : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक दोन दिवसांपूर्वी पुणे शहरात झाली. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यात भाजपमध्ये मोठे फेरबदल करण्याची घोषणा केली होती. कसब्याचा बदला आम्ही काढणार आहोत. येत्या ३० तारखेपर्यंत पुणे भाजपात मोठे बदल होतील. २०२४ पर्यंत भाजपात अनेक मोठे नेते येतील, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता. त्यानंतर दोनच दिवसांत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे गटाच्या आमदाराची भेट घेतली. यामुळे पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.

कोणाची घेतली भेट

चंद्रकांत पाटील यांनी घेतली ठाकरे गटाच्या माजी आमदाराची शनिवारी भेट घेतली. ठाकरे गटाचे कोथरूडचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्या निवासस्थानी जाऊन चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली. चंद्रकांत पाटील आणि चंद्रकांत मोकाटे यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे. मात्र ही भेट राजकीय नसल्याचं चंद्रकांत पाटलांच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण करण्यात आले. परंतु ही राजकीय भेट नव्हती तर कशासाठी भेट झाली? या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही. ठाकरे गटाला पुन्हा धक्का देण्याची तर ही तयारी ना? अशी चर्चा होत आहे.

हे सुद्धा वाचा

पुणे भाजपमध्ये होणार बदल

पुणे भाजपमध्ये मोठे बदल करण्याची तयारी सुरु आहे. कसबा हारल्याचा आम्ही बदला घेणार, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले होते. यामुळे पुणे शहरात भाजप मजबूत करण्यासाठी इतर पक्षातील कार्यकर्ते, नेत्यांना घेतले गेले तर आश्चर्य वाटायला नको.

दोन जिल्हाध्यक्षाची तयारी

पुणे भाजप संघटनेतही बदल केला जाणार आहे. आता दोन जिल्हाध्यक्ष देण्यात येणार असल्याची चर्चा सुरु आहे. ३० मे पर्यंत हे बदल करण्यात येणार आहे. आगामी महानगरपालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन हे बदल केले जाणार आहे.

एक वर्ष समर्पण द्या

प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष मजबूत करण्यावर भर दिला होता. ते म्हणाले होते की, येत्या निवडणुकीत महापालिका, लोकसभा, विधनासभा, निवडणुकीत आपणच जिंकणार आहोत. या लोकांकडून नकारात्मक प्रचार केला जात आहे. परंतु आपण जिंकणार, याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही. आता पुढचे सहा महिने महत्वाचे आहेत. त्यासाठी एका वर्षाचे समर्पण कार्यकर्त्यांनी पक्षाला द्यावे. मी ही देण्यास तयार आहे. हे समर्पण मोदींच्या कार्यासाठी, देशासाठी असणार आहे.