उरवडे आग प्रकरणात कंपनी मालकाला 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी, शिवाजीनगर कोर्टाचा आदेश

| Updated on: Jun 09, 2021 | 3:02 PM

कंपनी मालक निकुंज शहा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज त्याला शिवाजीनगर जिल्हा कोर्टात हजर केलं असता 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

उरवडे आग प्रकरणात कंपनी मालकाला 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी, शिवाजीनगर कोर्टाचा आदेश
Follow us on

पुणे : मुळशी तालुक्यातील उरवडे एमआयडीसीतील एसव्हीएस या रासायनिक कंपनीत लागलेल्या आगीत 18 कामगारांचा होरपळून मृत्यू झालाय. मृत्यांमध्ये 15 महिला कामगारांचा समावेश आहे. कंपनीला लागलेल्या आगीला कंपनी मालक जबाबदार असल्याचं पुणे ग्रामीण पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलंय. त्यानुसार कंपनी मालक निकुंज शहा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज त्याला शिवाजीनगर जिल्हा कोर्टात हजर केलं असता 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (Urwade SVS company fire case, Nikunj Shah remanded in police custody till June 13)

कंपनी मालकाच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात निदर्शनास आलं. या दुर्घटनेची प्राथमिक चौकशी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केलीय. त्यानंतर कंपनीचे मालक निकुंज शहा यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पौड पोलीस ठाण्याते पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ या प्रकरणाचा पुढील तपास करत असल्याचंही देशमुख यांनी सांगितलं.

मृतदेह 4 दिवसांनी नातेवाईकांना मिळणार

एसव्हीएस कंपनीला लागलेल्या आगीत मृत्यू झालेल्या कामगारांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. मात्र, पोलीस आणि ससून रुग्णालयाच्या समन्वयाअभावी मृतदेह अजून चार दिवसांनी नातेवाईकांकडे सोपवले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिलीय. डीएनए चाचणीसाठी रक्ताचे नमुने देण्यासाठी आलेल्या नातेवाईकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. मंगळवारी संध्याकाळनंतर सर्व नातेवाईकांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. आज ते नमुने न्याय वैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत. डीएनए चाचणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर शनिवारी रात्री उशिरा किंवा रविवारी सकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले जाणार आहेत. दरम्यान, या घटनेचा प्राथमिक चौकशी अहवाल रात्री उशिरा प्राप्त झाला असून या अहवालानुसार कारवाई करण्याच्या सूचना पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्यात.

मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांची मदत

“पुण्याच्या मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी, क्लेशदायक आहे. अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी, बचावासाठी शर्थीचे प्रयत्न करूनही काहींना वाचवता आलं नाही, हे अधिक दु:खदायक आहे. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहानुभूती असून, मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल”,अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

संबंधित बातम्या :

“मुळशी तालुक्याची रग दाखवून देऊ, कंपन्यांत घुसून पाहणी करु…”, प्रवीण तरडे भडकले

Breaking : उरवडे आग दुर्घटनेस कंपनी मालक जबाबदार, पौड पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Urwade SVS company fire case, Nikunj Shah remanded in police custody till June 13