आता गॅस सिलेंडरसाठी 96 तासांचा नवा नियम; दुसरे बुकिंग किती दिवसांनी करता येणार? नवीन आदेशात काय?

पुणे जिल्ह्यात गॅस सिलिंडर वितरणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन नियम लागू केले आहेत. आता बुकिंगनंतर ९६ तासांत गॅस घरपोच मिळणार असून, दोन सिलिंडरमध्ये २५ दिवसांचे अंतर असणे बंधनकारक आहे.

आता गॅस सिलेंडरसाठी 96 तासांचा नवा नियम; दुसरे बुकिंग किती दिवसांनी करता येणार? नवीन आदेशात काय?
LPG Gas 5
| Updated on: Mar 18, 2026 | 10:13 AM

इराण, इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणावपूर्ण परिस्थिती चिघळत चालली आहे. सध्या सुरु असलेल्या युद्धामुळे जागतिक इंधन पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या आणि नैसर्गिक वायूची टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी एलपीजी गॅसची कमतरता पाहायला मिळत आहे. यामुळे अनेक नागरिक एलपीजी गॅसचा साठा करुन ठेवत असल्याचे दिसत आहेत. आता याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी नवे आदेश जारी केले आहेत.

सिलेंडर तुम्हाला थेट घरपोच मिळणार

पुणे जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या वितरणाबाबत ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. हा संभ्रम दूर करण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी पत्रकारांशी संवाद साधत काही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. पुण्यात आता कुठेही गॅससाठी रांगा लावण्याची आवश्यकता नाही. तुम्ही गॅस बुकिंग केल्यानंतर ठराविक वेळेत सिलेंडर तुम्हाला थेट घरपोच मिळेल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅस वितरकांसाठी नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. ग्राहकांनी OTP प्रणालीद्वारे गॅस बुकिंग केल्यानंतर पुढील ९६ तासांच्या आत गॅस सिलेंडर घरापर्यंत पोहोचवणे आता अनिवार्य असणार आहे. कालपासूनच या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. याबद्दल पुणेकरही शिस्त पाळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

साठेबाजीला चाप लावण्यासाठी महत्त्वाचा निर्णय

त्यासोबतच सध्या सुरु असलेल्या एलपीजीची गॅसची साठेबाजीला चाप लावण्यासाठी प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता एकदा गॅस सिलेंडर घेतल्यानंतर ग्राहकाला दुसरा सिलेंडर घेण्यासाठी किमान २५ दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. याचाच अर्थ आता ग्राहकाला २५ दिवसांच्या अंतरानेच पुढचे गॅसचे बुकींग करता येणार आहे. तसेच कोणत्याही एजन्सीत २५ दिवसानंतरच गॅस बुकिंग स्वीकारले जाईल. ज्यांच्याकडे अधिकचे (Extra) सिलेंडर आहेत, अशा लोकांकडून गैरप्रकार होण्याची शक्यता असल्याने हा नियम लागू करण्यात आला आहे.

विनाकारण रांगा लावल्या जातात

त्यासोबत गॅस सिलेंडरचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त झाल्या आहेत. याची गंभीर दखल घेत त्यांनी गोपनीय पथके तैनात केली असून तपास सुरू केला आहे. काही लोक विनाकारण रांगा लावून भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत. मात्र गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. एजन्सीमार्फत केवळ OTP तपासूनच गॅस दिला जात आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तसेच, ज्यांच्याकडे अधिकृत गॅस कनेक्शन नाही, अशाच लोकांकडून गॅस मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us