Video : मध्यरात्री झालेल्या पावसाने पुण्याला झोडपलं! कोणकोणत्या भागाला सर्वाधिक फटका?

| Updated on: Oct 18, 2022 | 7:29 AM

पुण्यातील रस्त्यांना नद्यांचं स्वरुप! हायवे पाण्याखाली, धुव्वाधार पावसाने पुणे पुन्हा कसं तुंबलं, पाहा...

Video : मध्यरात्री झालेल्या पावसाने पुण्याला झोडपलं! कोणकोणत्या भागाला सर्वाधिक फटका?
मुसळधार पावसाने पुणे जलमय
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

ब्युरो रिपोर्ट, टीव्ही 9 मराठी, पुणे : पुण्यात रात्री अडीच वाजेपर्यंत धुवाँधार पावसाने (Pune Rain News) हजेरी लावली. सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे पुण्याचा बहुतांश भाग पाण्याखाली (Pune Flood) गेल्याचं चित्र पाहायला मिळालंय. पहाटेपासून पावसाने विश्रांती जरी घेतली असली, तरी अनेक भागात पाणी साचलं. रात्रभर सुरु असलेल्या पावसाने पुणेकरांची (Pune News) झोपही उडवली. दरम्यान, या पावसामुळे हायवेवरील वाहतुकीवरही परिणाम झाला. आता पावसाने विश्रांती घेतलीय. तसंच पाणी ओसरण्यासही सुरुवात झालीय.

पुणे जलमय

पुणे सोलापूर हायवेवर मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने सखल भागात पाणीच साचलं. त्यामुळे हायवेवरील वाहतुकीचा वेग मंदावला होता. पुणे सोलापूर हायवेवर वाहनांच्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं.

पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ मंदिरासह पुणे स्टेशनमध्येही पाणी शिरलं होतं. पुण्यातील पावसाचा फटका महालक्ष्मी एक्सप्रेसला देखील बसला. त्यामुळे प्रवाशांना फलाटावरचं उभं राहण्याची वेळ आली होती. तिकीट काउंटरच्या ठिकाणीदेखील गुडघाभर पाणी साचलं होते.

पहाटेपासून विश्रांती

कोंढवा, हडपसर आणि येवलेवाढी भागातील रस्तेही जलमय झाले होते. पहाटेपासून पावसाने विश्रांती घेतलीय. आता पावसाचं पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र परतीच्या पावसाचा पुन्हा एकदा तडाखा पुणेकरांना बसलाय. सकाळी कामानिमित्त जाण्यासाठी बाहेर पडलेल्यांना रात्रभर झालेल्या पावसाचा जोर किती प्रचंड होता, याची अनुभव आलाय.

पुण्यातील सोमवार पेठेत पावसानं रस्त्याच्या कडेला लावलेल्या दुचाकी पाण्याबरोबर वाहून गेल्या. दुचाकी वाहून जातानाचा व्हिडीओही व्हायरल झालाय. एक कारही पुराच्या पाण्यात अडकली होती.

पुण्यातील शनिवार वाडा, बिबवेवाडी परिसरात जोरदार पाऊस झालाय. त्यामुळे सखल भागात पाणी साचलं. एरंडवणा रस्त्यावर पावसाचे पाणी साचले होते. त्यामुळे पुणेकरांना रस्त्यातून वाट काढतांना मोठी कसरत करावी लागत होती. तसंच जंगली महाराज रस्ता, अलका टॉकीज चौक, फर्ग्युसन कॉलेज रोडवर गुडघाभर पाणी साचलं होतं.

पाहा व्हिडीओ :

मुसळधार पावसामुळे आळंदी रोडवरील आरटीओ कार्यालयाजवळ रस्त्यावरील वाहतूक थांबवण्यात आली होती. पाण्याचा अंदाज येत नसल्यानं दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात आली होती.पुण्यात झालेल्या पावसामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागातील सगळे कर्मचारी रात्रीही कामावर होते. शहरातील ठिकठिकाणची माहिती घेवून आपत्ती व्यवस्थापन मदत करत होते.

पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कात्रजमध्ये रस्त्यावर पाणीच पाणी साचले होते. यावेळी मनसे नेते वसंत मोरे यांनी रस्त्यावरील वाहनांना योग्य मार्गदर्शन करत मदत केली. तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याला पावसानं झोडपून काढलं. यावेळी पिंपरी पेंढार गावाता शाळेजवळ वीज कोसळतानाची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली.