पुणे जैन बोर्डिंग प्रकरण, जैन मुनींची मोठी घोषणा, फडणवीसांकडे काय केली मागणी?

पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरण सध्या चांगलंच तापलं आहे, हा व्यवहार रद्द करण्यात आला आहे, मात्र त्यानंतर आता जैन मुनी आचार्य गुप्तिनंदजी महाराज यांनी मोठी घोषणा केली आहे.

पुणे जैन बोर्डिंग प्रकरण, जैन मुनींची मोठी घोषणा, फडणवीसांकडे काय केली मागणी?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 28, 2025 | 4:23 PM

पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरण सध्या राज्यभरात चांगलंच गाजत आहे, शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी जैन बोर्डिंग प्रकरणात भाजपचे खासदार आणि केंद्रीय राज्य मंत्री असलेल्या मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले होते, त्यामुळे मुरलीधर मोहोळ यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली होती, त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते, मात्र तरी देखील हे प्रकरण चांगलंच तापलं, त्यानंतर या प्रकरणात जैन मुनींनी मोठं आंदोलन उभारणार असल्याचा इशारा दिला होता.

मुरलीधर मोहोळ यांनी सुरू असलेल्या आरोपांनंतर थेट जैन बोर्डिंगमध्ये जाऊन जैन मुनींची भेट घेतली होती, त्यांच्यासोबत चर्चा केली. दरम्यान दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुणे दौऱ्यावर असताना रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती, एकनाथ शिंदे यांनी रवींद्र धंगेकर यांना संयमाचा सल्ला दिला होता, आणि दोन दिवसांमध्ये हा प्रश्न सोडवू असं आश्वासन देखील दिलं होतं. दरम्यान त्यानंतर आता हा व्यवहार रद्द करण्यात आला आहे. यावर आता जैन मुनी आचार्य गुप्तिनंदजी महाराज यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले जैन मुनी?   

आमच्याकडे बातमी आली बिल्डरनी माघार घेतली आहे, आणि आज अर्ज दाखल केला आहे. सुनावणीदरम्यान त्यांना दोन दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. पुढील सुनावणी 30 ऑक्टोबर रोजी होणार आहे. गोखले बिल्डर आणि ट्रस्टला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अजून दोन दिवस आम्हाला साधना करावी लागेल,  जोपर्यंत ही डील संपूर्णपणे रद्द होत नाही, तोपर्यंत आमचा हा मोर्चा सुरू राहील.  जमीन आणि मंदिर ट्रस्टकडे पुन्हा येईपर्यंत लढा सुरू राहणार, असं जैन मुनी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की,  आमचं आंदोलन कोणत्याही पक्षाविरोधात नाही, आमचं आंदोलन भ्रष्टाचाराविरोधात आहे.  जोपर्यंत संपूर्ण डील रद्द होत नाही, तोपर्यंत लढा सुरूच राहणार आहे, देशभरात जैन बांधव उद्या एकदिवसीय उपवास करणार आहेत, असं यावेळी जैन मुनी यांनी म्हटलं आहे, तसेच  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  स्वतः जैन बोर्डिंगमध्ये यावं,  राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळानं जैन बोर्डिंगमध्ये यावं, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे.