कसबाचा पराभव भाजपसाठी धोक्याची घंटा, मनपासाठी ‘मविआ’चा काय असेल दावा

| Updated on: Mar 03, 2023 | 10:23 AM

कसब्यातला पराभव हा भाजपसाठी मोठा धक्का आहे. कारण राज्यात सत्तांतरानंतर ही पहिलीच पोटनिवडणूक होती. त्यातच पराभव झाला.

कसबाचा पराभव भाजपसाठी धोक्याची घंटा, मनपासाठी मविआचा काय असेल दावा
Follow us on

पुणे : कसब्याच्या लढाईत अखेर, काँग्रेसनं बाजी मारली. भारतीय जनता पक्षाला त्यांच्या परंपरागत मतदारसंघात जबर धक्का बसला. तब्बल 32 वर्षानंतर कसब्यात रवींद्र धंगेकरांच्या रुपात काँग्रेसचा विजय झाला. कसब्याच्या पोटनिवडणुकीत भाजपचे हेमंत रासने यांचा 11 हजार 40 मतांनी पराभव झाला. कसबा पेठ पोटनिवडणूक निकालानंतर भाजपच्या इच्छुक नगरसेवकांना आगामी महापालिका निवडणूक सोपी राहणार नसल्याचे स्पष्ट झालेय. यामुळे भाजपला या ठिकाणी नवीन रणनिती तयार करावी लागणार आहे.

कसबा मतदार संघात किती नगरसेवक

हे सुद्धा वाचा


महापालिकेचा सध्याचा प्रभाग क्रमांक १७ म्हणजेच सदाशिव पेठपासून नारायण पेठेपर्यंत आणि शनिवार पेठ या भागांतील जागांवर परिणाम होणार आहे. महाविकास आघाडीने महापालिका निवडणुकांची प्रभागरचना सत्तेत असताना केली होती. या प्रभागांतील नगरसेवकांची संख्या कमी करुन भाजपच्या नगरसेवकांना एकमेकांसमोर उभे राहण्याची खेळी खेळली होती.

राज्यात सत्तांतर झाले असले, तरी महापालिका निवडणुकांसाठीची प्रभागरचनेत बदल झालेला नाही.हे प्रकरण न्यायालयात आहे. आता सदाशिव-नारायण-शनिवार पेठेतही पोटनिवडणुकीत काँग्रेसला झालेले मतदान पाहता भाजपच्या नगरसेवकांसाठी आगामी निवडणूक डोकेदुखीची ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.कसबा विधानसभा मतदारसंघ परिसरातून २४ नगरसेवक आहेत . त्या १६ मतदार संघात तर सीमेवरील आठ आहेत. एकूण २४ नगरसेवक आहेत.

तर भाजपची अडचण


प्रभाग रचनेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. यासंदर्भात निकाल आला आणि जर पालिकेच्या निवडणुका जुन्या रचनेनुसारच घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले, तर भाजपसमोर संकट उभे राहणार आहे. विधानसभेत काँग्रेसचा उमेदवार निवडून आल्याने भाजपला तोही फटका बसणार आहे. भारतीय जनता पक्षात असलेले पूर्व पुण्यातील काही नगरसेवक महाविकास आघाडीकडून लढण्याच्या पर्याय स्विकारु शकतात. यामुळे या निवडणुकीने कसब्यातील महापालिका निवडणुकीची अनेक समीकरणे बदलली आहेत.

साडेतीन वर्षांत बदल

कसब्यातला पराभव हा भाजपसाठी मोठा धक्का आहे.  कारण राज्यात सत्तांतरानंतर ही पहिलीच पोटनिवडणूक होती. त्यातच पराभव झाला.  चिंचवडमध्ये भाजपला विजय मिळाला असला तरी बालेकिल्ला असलेल्या कसब्यात  पराभव झाला आहे. गेल्या साडेतीन वर्षांत कसब्यातला मतदार काँग्रेस अर्थात महाविकास आघाडीच्या बाजूनं उभा राहिला.

भाजपनं 32 वर्षांपासूनचा कसबा बालेकिल्ला गमावला. 32 वर्षांनंतर भाजपच्या परंपरागत मतदारसंघात काँग्रेसनं एंट्री केली. भाजप-शिंदेंच्या शिवसेना युतीच्या विरोधात कसब्यात मतदान झालं. या युतीला मनसेची साथ होती. यामुळे कसब्यात फडणवीस-शिंदे जोडीच्या विरोधात महाविकास आघाडी सरस ठरली. 2019मध्ये भाजपचा 28 हजारांनी विजय पण साडे 3 वर्षात 11 हजारांनी पराभव झाला. टिळक कुटुंबात तिकीट न दिल्यानं ब्राह्मण समाजाची नाराजी उमटली.