
पुणे | 10 ऑक्टोंबर 2023 : राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे सामाजिक कार्यात नेहमी आघाडीवर असतात. कोरोना काळात त्यांनी केलेले काम पुणेकरांना कायमचे लक्षात राहिले. अजूनही कुठे काही घडले किंवा कोणाला गरज असली तर वसंत मोरे धावून जातात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते सतत संपर्कात असतात. आता त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची महत्वकांक्षा जाहीर केली आहे. त्यासाठी त्यांनी राज ठाकरे यांना साकडे घातले आहे. परंतु आता त्यांना लाल दिव्याची ॲम्बेसिडर गाडी मिळाली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहचला आहे.
वसंत मोरे यांचा १० ऑक्टोंबर रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने शहरात त्यांचे बॅनर्स लागले आहेत. त्या बॅनरवर भावी खासदार म्हणून वसंत मोरे यांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यात किंग ऑफ पुणे वसंत मोरे म्हटले आहे. त्यांच्या त्या बॅनरची चर्चा सर्वत्र सुरु असताना आता त्यांना लाल दिव्याची गाडी मिळाली आहे. वसंत मोरे यांच्या वाढदिवसाला त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना लाल दिव्याची ॲम्बेसिडर गिफ्ट दिली आहे.
लाल दिव्याची ॲम्बेसिडर वसंत मोरे यांना अखिल मोरे बाग मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी भेट दिली आहे. पुणे शहरातून लोकसभा निवडणूक लढवून खासदार होण्याची इच्छा त्यांनी आधीच व्यक्त केली आहे. आता लाल दिव्याची गाडी भेट दिल्यामुळे खासदारकीसोबत मंत्रीपदाचेही स्वप्न वसंत मोरे यांना पडू लागले आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
मनसेने आपणास लोकसभा निवडणुकीचे तिकीट दिल्यास आपण निवडून येऊ असा दावा वसंत मोरे यांनी केला आहे. वसंत मोरे यांनी सांगितले की, सध्या ज्या पद्धतीचे राजकारण सुरु आहे, त्याला जनता वैतागली आहे. सध्या राजकारण धरसोडीचे झाले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जनतेत मनसेचे अस्तित्व टिकून आहे. यामुळे सर्वसामान्य जनता आणि पुणेकर मनसेच्या सोबत असून आपल्यास तिकीट मिळाल्यास विजय निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले.