पुरुषांना लग्नाच्या जाळ्यात अडकवून लुबाडणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश, पुणे ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

| Updated on: Feb 10, 2021 | 5:13 PM

पुरुषांना लग्नाचं आमिष दाखवून त्यांना लुबाडणाऱ्या एका महिला टोळीला पोलिसांनी जेरबंद केलं आहे (Pune Police busted gang of female thugs)

पुरुषांना लग्नाच्या जाळ्यात अडकवून लुबाडणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश, पुणे ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
Follow us on

पुणे : पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने एक मोठी कामगिरी केली आहे. पुरुषांना लग्नाचं आमिष दाखवून त्यांना लुबाडणाऱ्या एका महिला टोळीला पोलिसांनी जेरबंद केलं आहे. आरोपी महिला पुरुषांना लग्नाचं आमिष दाखवून त्यांच्याकडून दोन-तीन लाख रुपये घ्यायच्या. याशिवाय सोने-चांदीचे दागिने घ्यायचे. पुरुषांसोबत थोडे दिवस राहायचे. त्यानंतर संधी मिळताच पळून जायचे. अशा प्रकरणाशी संबंधित एका प्रकरणाची तक्रार पुणे ग्रामीण पोलिसांकडे आली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना गुन्हे शाखेने पुरुषांना लुबाडणाऱ्या एका महिला टोळीचा पर्दाफाश केला आहे (Pune Police busted gang of female thugs).

पुण्यातील एक व्यक्ती लग्नासाठी मुलगी शोधत होता. यावेळी त्याला वाघोलीच्या ज्योती पाटील या 35 वर्षीय महिलेने एक गरीब घराण्यातील मुलगी त्याच्यासोबत लग्न करण्यास इच्छूक असल्याची माहिती दिली. त्यानुसार त्या गरीब घराण्यातील महिलेसोबत त्या पुरुषाचं जानेवारी महिन्यात लग्न जुळलं. नवरदेवाने नवरीला जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात 2 लाख 40 हजार रुपये दिले. मात्र, अवघ्या एक आठवड्यात नवरीविरोधात नवरदेवच्या घरच्यांनी पोलिसात तक्रार केली (Pune Police busted gang of female thugs).

संबंधित नवरी नवरदेवाकडून घेतलेले 2 लाख 40 हजार रुपये आणि घरातील सर्व दागिने घेऊन पसार झाली होती. याबाबतची तक्रार नवरदेवच्या कुटुंबियांनी पुणे ग्रामीण पोलिसांना केली. पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणाची गंभीर दखल घेत तातडीने तपासाला सुरुवात केली. पोलीस अधिकारी पद्माकर घणावत यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखेला संबंधित महिलेला शोधून काढण्यात यश आलं.

पोलिसांनी आरोपी महिलेची कसून चौकशी केली तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. संबंधित महिलेने त्याआधी आणखी दोन तरुणांशी लग्न केलं होतं. त्यानंतर तिने स्वत:चं नाव बदललं होतं, असा खुलासा चौकशीत झाला. पोलिसांनी तिची सखोल चौकशी केली. त्यावेळी तिने आपल्या इतर सहकाऱ्यांची देखील नावे सांगितली. याशिवाय ज्योती पाटील ही महिला लग्नाचं वय निघून गेलेल्या पुरुषांना गाठून गरीब घरातली मुलगी असल्याचं सांगत अनेकांना लुबाडत असल्याची माहिती तपासात आली.

अखेर या प्रकरणी पोलिसांनी नऊ महिला आणि दोन पुरुषांना अटक केली. आरोपी महिलांनी आतापर्यंत पाच पुरुषांना लुबाडल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. मात्र, महिलांनी आणखी बऱ्याच पुरुषांना लुबाडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

संबंधित बातमी : लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू पसार, चार लाखांच्या दागिन्यांसह सासरहून पोबारा