पुणे पोर्श अपघातप्रकरणातील आरोपीच्या कुटुंबाचा डान्स पाहून पीडित कुटुंब संतापले, म्हणाले किमान माणुसकी…

पुणे पोर्श कार अपघातातील अल्पवयीन आरोपीच्या कुटुंबाचा डान्स व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, मृत अश्विनी कोस्टाच्या वडिलांनी 'हा निर्लज्जपणाचा कळस आहे' अशा कडक शब्दांत आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे.

पुणे पोर्श अपघातप्रकरणातील आरोपीच्या कुटुंबाचा डान्स पाहून पीडित कुटुंब संतापले, म्हणाले किमान माणुसकी...
Pune Porsche Car Accident
| Updated on: May 28, 2026 | 9:07 AM

पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या भीषण पोर्श कार अपघातातील अल्पवयीन आरोपीला जामीन मिळाल्यानंतर त्याच्या कुटुंबाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आरोपीचे कुटुंबिय गळ्यात नोटांचा हार घालून त्याचे मित्र आणि नातेवाईकांसोबत डान्स करताना आणि आनंद साजरा करताना पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच सर्वसामान्य नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. आता या व्हिडीओवर अपघातातील एका पीडित कुटुंबाने कडक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्यातील पोर्श कार अपघातात जबलपूरची तरुण सॉफ्टवेअर इंजिनिअर अश्विनी कोस्टा हिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यानंतर आरोपीच्या कुटुंबियांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अश्विनीचे वडील सुरेश कोस्टा यांनी संताप व्यक्त केला आहे. अग्रवाल कुटुंबाचे हे कृत्य अमानवीय आणि निर्लज्जपणाचा कळस आहे, असे सुरेश कोस्टा म्हणाले.

माणुसकी नावाची गोष्ट शिल्लक राहिलेली नाही

या अग्रवाल कुटुंबाला आता जराही लाज, लज्जा आणि माणुसकी नावाची गोष्ट शिल्लक राहिलेली नाही. त्यांच्या घरातील मुलामुळे दोन निष्पाप जीव गेले. दोन कुटुंबं उद्ध्वस्त झाली आणि हे लोक येथे डान्स पार्ट्या करत आहेत. कायद्यात जामिनाची तरतूद आहे म्हणून त्यांना जामीन मिळाला असेल, पण किमान माणुसकीच्या नात्याने तरी त्यांनी अशा गोष्टी टाळायला हव्या होत्या. यावरून सिद्ध होते की त्यांची माणुसकी पूर्णपणे मेली आहे, असे सुरेश कोस्टा यांनी म्हटले.

यावेळी अश्विनीच्या वडिलांनी केवळ संताप व्यक्त न करता देशातील कायद्यात आणि न्यायव्यवस्थेत महत्त्वाचे बदल करण्याची मागणी केली आहे. आरोपीचे कुटुंब ज्या पद्धतीने वागत आहे ते पाहता, गुन्हेगारांच्या मनात कायद्याची कोणतीही भीती राहिलेली नाही. त्यामुळे मुख्य आरोपी विशाल अग्रवाल आणि संबंधित आरोपींचा जामीन त्वरित रद्द करण्यात यावा. आजच्या डिजिटल आणि आधुनिक युगात १६ ते १८ वयोगटातील मुलांना काय योग्य आणि काय अयोग्य याची पूर्ण जाणीव असते. दारू पिऊन भरधाव वेगाने गाडी चालवणे हा गुन्हा आहे हे त्यांना समजते. त्यामुळे अशा गंभीर आणि जघन्य गुन्ह्यांमध्ये केवळ ‘अल्पवयीन’ (Minor) असण्याचा फायदा आरोपीला मिळू नये. कायद्यातील तरतुदींवर केंद्र सरकारने पुनर्विचार करावा, अशी मागणी सुरेश कोस्टा यांनी केली आहे.

कडक कारवाई करा

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कायदेशीर यंत्रणेवर आणि आरोपीच्या श्रीमंत कुटुंबावर सर्वसामान्य नागरिकांमधून टीका होत आहे. श्रीमंतीच्या जोरावर कायद्याची आणि मानवी भावनांची थट्टा उडवली जात आहे, असा सूर सोशल मीडियावर उमटत आहे. त्यामुळे या प्रकरणात अधिक कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

Follow Us